बातम्या

पोलिसच असुरक्षित! मग सामान्य जनतेचा काय? — पोलिस लाईनमधूनच गाडी चोरीला

जळगाव पोलिस लाईनमध्येच चोरी! पोलिसांच्या वसाहतीत घडली लाजिरवाणी घटना

जळगाव (प्रतिनिधी) — जळगाव शहरात पोलिस लाईन परिसरातच ट्रॅफिक पोलिस हेडकॉन्स्टेबलची मोटारसायकल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या वसाहतीतच पोलिसाची गाडी चोरीस गेल्याने शहरात आणि पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. “जर पोलिसच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचा काय?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ही घटना शनिवारी मध्यरात्री १२ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास घडली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी शिवाजी भगवान महाजन (वय ५३) हे ट्रॅफिक शाखेत हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून, पोलिस हौसिंग सोसायटी, जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी २०२४ मध्ये नोकरीस ये-जा करण्यासाठी बजाज पल्सर १२५ सीसी (MH19 EM 1999) ही मोटारसायकल विकत घेतली होती.

११ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता त्यांनी गाडी घरासमोर उभी करून दरवाजा बंद केला व झोप घेतली. मात्र पहाटे साडेदोन वाजता गाडीचा लॉक तोडण्याचा आवाज आल्याने ते आणि त्यांचा मुलगा प्रतीक बाहेर आले, तोवर गाडी गायब झाली होती.

रस्त्यावर टॉर्च लावून पाहिले असता चॉकलेटी रंगाचा शर्ट व काळ्या पँटमध्ये एक इसम गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. आवाज दिल्यावर त्याने गाडी सुरु करून कोर्ट चौकाच्या दिशेने पलायन केले. मुलगा प्रतीकने त्याचा पाठलाग केला, तर फिर्यादींनी विविध ठिकाणी शोध घेतला पण गाडीचा काहीच मागमूस लागला नाही.

शेवटी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

🔹 चोरीस गेलेल्या गाडीचे तपशील:

  • कंपनी: बजाज
  • मॉडेल: पल्सर 125 सीसी
  • रंग: काळा-लाल
  • क्रमांक: MH19 EM 1999
  • चेसिस नं: MD2B68BX7RWG15801
  • इंजिन नं: DHXWRG45806
  • अंदाजे किंमत: ₹70,000

या घटनेने पोलिस विभागात चिंता वाढली असून, “ट्रॅफिक पोलिसाच्याच गाडीवर चोराचा हात — पोलिसांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह?” अशी चर्चा शहरभर रंगली आहे.

दरम्यान नागरिकांतून शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा बसवावा आणि पोलिसांनी स्वतःच्या वसाहतीतील सुरक्षेची जबाबदारी अधिक काटेकोरपणे घ्यावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!