बातम्या

चाळीसगावमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरण उघड! २.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

चाळीसगाव :चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने बाहेर जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन चोरट्यांना अटक करून तब्बल २,४५,००० रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १३४/२०२५ भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) नुसार मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा. सोनगाव, ता. मालेगाव) आपल्या साथीदारांसह मोटारसायकल चोरीत गुंतला आहे.

 

या माहितीनुसार पथकाने कारवाई करत भगवान करगळ याला जळगाव फाटा, निफाड येथून, आकाश गोविंद गायकवाड (रा. जळगाव फाटा, निफाड) याला सटाणा येथून, व दादू संजय सोनवणे (रा. दरेगाव, ता. मालेगाव) याला दरेगाव येथून अटक केली. तीनही आरोपींच्या ताब्यातून तपासणी केल्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहर व तालुक्यातून चोरलेल्या ३ मोटारसायकलींची कबुली दिली.

 

या आरोपींनी पुढील गुन्ह्यांमध्ये मोटारसायकल चोरीची कबुली दिली आहे:

  • चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गु.नं. १३४/२०२५ भा.दं.सं. ३०३(२)
  • चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गु.नं. १३५/२०२५ भा.दं.सं. ३०३(२)
  • मेहुणबारे पोलीस स्टेशन गु.नं. ८८/२०२५ भा.दं.सं. ३०३(२)

 

तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या आणखी एका दुचाकीचा देखील शोध घेऊन ती ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे एकूण २.४५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी भगवान करगळ याच्यावर यापूर्वी जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी व इतर प्रकारच्या १३ गुन्ह्यांची नोंद आहे.

ही यशस्वी कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव व मा. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. शेखर डोमाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पथकात पो.ह. मुरलीधर धनगर, पो.ना. महेश पाटील, पो.का. भूषण शेलार, पो.का. सागर पाटील, पो.का. मिर्लीद जाधव, पो.का. दिपक चौधरी आणि पो.ह. भारत पाटील यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!