शाळेत CEOचा सरप्राईज दौरा – विद्यार्थ्यांमध्ये बसून घेतला पोषण आहार!

जळगाव / प्रतिनिधी (15 एप्रिल): जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी मंगळवार, दिनांक 15 एप्रिल रोजी भुसावळ तालुक्यातील विविध गावांना अचानक भेट देत ग्रामविकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी घरकुल बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालये व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पाहणी केली.
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात श्रीमती करनवाल यांनी किन्ही व साकरी या गावांना भेट दिली. येथे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयांची पाहणी करत त्यांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी दोन्ही गावांतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट दिली आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विशेष म्हणजे, शाळेतील पोषण आहार कितपत दर्जेदार आहे, हे पाहण्यासाठी श्रीमती करनवाल यांनी स्वतः जमिनीवर विद्यार्थ्यांसोबत बसून शालेय पोषण आहाराची चव घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना प्रोत्साहन दिले.
या दौऱ्यात त्यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करावेत, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत असे मार्गदर्शन केले. गावांमध्ये सुरू असलेल्या घरकुल योजनांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी कामांची गुणवत्ता व अंमलबजावणीबाबत माहिती घेतली.
त्यांच्यासोबत भुसावळ गटविकास अधिकारी श्री. सचिन पानझडे उपस्थित होते. ग्रामविकास, शिक्षण आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा थेट आढावा घेण्यासाठी केलेला हा दौरा कार्यक्षम प्रशासनाचे उदाहरण ठरला.