शाहूनगरमध्ये हल्ला! तुरुंगातून बाहेर पडताच तरुणाला लोखंडी शस्त्राने जबर मारहाण

जळगाव (प्रतिनिधी) : शाहूनगरमध्ये जामिनावर सुटलेल्या तरुणावर २० ते २५ जणांचा प्राणघातक हल्ला शहरातील शाहूनगर परिसरात हॉटेल धैर्यमजवळ जामिनावर सुटून घरी जात असलेल्या तरुणावर २० ते २५ अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामध्ये तरुणाच्या वडिलांना आणि भावालाही दुखापत झाली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
५१ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या तरुणावर सुटताच हल्ला
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रतीक हरदास निंबाळकर (वय २४, रा. सिटी कॉलनी, कानळदा रोड, जळगाव) असे आहे. प्रतीक ५१ महिन्यांपासून खुनाच्या आरोपाखाली नोव्हेंबर २०२० पासून जिल्हा कारागृहात होता. शुक्रवारी, २१ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी प्रतीकचा जामीन मंजूर झाला.
जामीन मिळाल्यानंतर प्रतीकला त्याचे वडील हरदास निंबाळकर आणि भाऊ वैभव निंबाळकर यांनी जिल्हा कारागृहातून सोडवून आणले. तिघेही दुचाकीवरून घरी निघाले असताना शाहूनगर परिसरातील हॉटेल धैर्यमजवळ पोहोचताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. या धडकेमुळे तिघेही रस्त्यावर कोसळले.
धारदार शस्त्रांनी डोक्यावर वार, वडील व भावालाही मारहाण
दुचाकीवरून खाली पडल्यानंतर हल्लेखोरांनी प्रतीक निंबाळकरवर लक्ष केंद्रित करत त्याच्या डोक्यावर धारदार लोखंडी वस्तू आणि इतर शस्त्रांनी तुफान मारहाण सुरू केली. उजव्या बाजूला डोक्यात जबर मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी प्रतीकच्या वडिलांनाही (हरदास निंबाळकर) तसेच भावालाही (वैभव निंबाळकर) दगड आणि इतर वस्तूंनी मारहाण केली.
हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर प्रतीकच्या वडिलांनी आणि भावाने तातडीने रिक्षाच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचारासाठी दाखल केले
अतिदक्षता विभागात प्रतीकवर उपचार सुरू, डोक्याला जबर दुखापत
रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय पथकाने तत्काळ प्रतीक निंबाळकरला अतिदक्षता विभागात हलवले. प्राथमिक तपासणीत डोक्याच्या उजव्या बाजूला कवटी फॅक्चर झाल्याचे तसेच रक्तस्राव झाल्याचे आढळले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस स्टेशन व एलसीबीचे (लोकल क्राईम ब्रँच) पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच डीवायएसपी संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी शासकीय रुग्णालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पोलिसांना हल्लेखोरांचा शोध सुरू, शहरात खळबळ
दरम्यान, पोलिसांना हल्लेखोरांविषयी काही महत्त्वाची माहिती मिळाली असून, पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी जळगावच्या अयोध्या नगरात देखील प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. त्यानंतर लगेचच हा हल्ला झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील तपास सुरू
या घटनेनंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांचे पथक संशयित आरोपींचा शोध घेत आहे. या हल्ल्यामागील कारण काय आहे, त्याचा संबंध प्रतीक निंबाळकरच्या जुन्या प्रकरणांशी आहे का, हे पोलिस तपासातून स्पष्ट होईल.