ढोल-ताशांच्या गजरात भावी सदस्यांचे आगमन – देवीचा आशीर्वाद कुणाला?

जळगाव – नवरात्रौत्सवामुळे जिल्हाभर वातावरण धार्मिक उत्साहाने भरून गेले असले तरी त्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण मध्ये काही जिल्हा परिषद गटामध्ये , जिल्हा परिषद निवडणुकीचे सूरही उमटू लागले आहेत. दिवाळीनंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याआधीच भावी उमेदवारांनी देवीच्या आरत्या आणि उत्सवाच्या निमित्ताने राजकीय जनसंपर्क मोहीमा सुरू केल्या आहेत.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भावी उमेदवारांची तिकीट मिळेल की नाही, कट होईल की काय या संदर्भातील उत्सुकता आणि धाकधुक आता सर्वत्र जाणवू लागली आहे.नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची देवीच्या आरतीत हजेरी आणि गावोगावी भेटीगाठी हा फक्त धार्मिक सोहळाच नाही तर तिकीट मिळवण्यासाठी जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये आपली ताकद दाखवण्याचा माध्यम ठरत आहे. त्यामुळे भावी जिल्हा परिषद सदस्यांचे राजकीय स्वप्न साकार होईल की नाही हे आता लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि धर्मसोहळ्यातील आशीर्वादाच्या नादावर अवलंबून राहिले आहे.
गावोगावी देवी मातेच्या आरतीसाठी उमेदवार उपस्थित राहताना दिसत आहेत. त्यांच्या आगमनावेळी स्थानिक कार्यकर्ते व युवक ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि स्वागताची दिमाखदार सोय करतात. या सोहळ्यात धार्मिकतेसोबत राजकीय शक्तीप्रदर्शन दडलेले आहे, हे लक्षात येते.
जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उमेदवारांची धडपड
नवरात्रौत्सवात देवी मातेचा आशीर्वाद घेण्याची धडपड उमेदवारांकडून सुरू आहे. मात्र या मागे खरी धावपळ आहे ती जनतेचा विश्वास, मतदारांचा आधार आणि स्थानिक पातळीवरील संघटनशक्ती दाखवण्याची. धार्मिक सोहळ्यात उमेदवारांचा सहभाग हा केवळ श्रद्धेचा भाग नसून, तो आगामी निवडणुकीतील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रभावी मार्ग ठरत आहे.
धार्मिक मंचावरून राजकीय संदेश
उत्सवाच्या निमित्ताने उमेदवारांचे ‘लोकदर्शन’ घडत आहे. गावोगावी आरतीवेळी उमेदवारांनी हजेरी लावणे, भक्तगणांशी संवाद साधणे, आशीर्वाद घेणे या कृतींमधून “मी तुमच्या सोबत आहे” असा अप्रत्यक्ष संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे.
आगामी काळात खरी कसोटी
देवी मातेचा प्रसन्न आशीर्वाद कोणाला लाभतो आणि मतदारांचा विश्वास नेमका कुणाकडे झुकतो हे मात्र आगामी निवडणूक निकालात स्पष्ट होईल. नवरात्रोत्सवाचा धार्मिक गजर ओसरल्यानंतर राजकीय रणशिंग फुंकले जाईल आणि तेव्हाच या धार्मिक आशीर्वादाचे राजकीय रूपांतर मतपेटीत होते का, याची खरी कसोटी लागेल.