मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना मोठा इशारा: ड्रग्स प्रकरणात आढळल्यास थेट बडतर्फी

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला मोठा इशारा देत ड्रग्स प्रकरणात कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळल्यास त्याच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. शनिवारी झालेल्या महाराष्ट्र पोलीस परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यात ड्रग्स विरोधात झिरो टोलरन्सी पॉलिसी असणार आहे. कोणताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी ड्रग्स प्रकरणात सापडल्यास त्याला निलंबित केले जाणार नाही, तर थेट सेवेतून हटवले जाईल.”
परिषदेत देशातील नव्याने लागू होत असलेल्या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. तसेच सायबर सुरक्षेसंदर्भात सादरीकरण झाले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी वेळेत आणि जलद गतीने आरोपपत्र दाखल करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
उद्योगांना अनावश्यक त्रास होऊ नये, महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासात विलंब होऊ नये यासाठी शासन ट्रॅकिंग प्रणालीच्या माध्यमातून लक्ष ठेवत आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच नवीन कायद्यानुसार जप्त केलेली संपत्ती सहा महिन्यांत मूळ मालकाकडे परत करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीपासूनच कठोर तपास केला असून, संपूर्ण पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या खटल्यासाठी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून, आरोपींना कठोर शिक्षा होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.