गोरे व्हायचंय? मग या जळगावच्या रस्त्यावरून एक फेरी मारा!
इच्छादेवी ते आकाशवाणी मार्गावरील धुळीच्या साम्राज्याची विदारक कहाणी; नूतन जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीच्या हस्तक्षेपाची अपेक्षा

जळगाव। १९ ऑक्टोबर २०२५ । तुम्हाला कोणतेही महागडे क्रीम न वापरता ‘गोरे’ व्हायचे आहे का? मग फार लांब जाण्याची गरज नाही. जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातून आकाशवाणी चौकाकडे जाणारा रस्ता पकडा. या रस्त्यावरून, विशेषतः एखाद्या ट्रक किंवा अवजड वाहनाच्या मागून तुम्ही तुमची दुचाकी चालवत गेलात, तर आकाशवाणी चौकात पोहोचेपर्यंत तुम्ही इतके ‘गोरे’ व्हाल की कदाचित तुमचे कुटुंबीय सुद्धा तुम्हाला ओळखणार नाहीत!
हा कुठला विनोद नाही, किंवा ब्युटी पार्लरची जाहिरातही नाही. हे आहे जळगाव शहरातील एका प्रमुख रस्त्याचे भीषण वास्तव. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ही परिस्थिती इतकी विकोपाला गेली आहे की, “इच्छादेवी जवळ काळा दिसणारा माणूस आकाशवाणीपर्यंत गोरा होतो,” अशा उपरोधिक आणि तितक्याच संतप्त प्रतिक्रिया आता ‘काट्यावरची कुजबुज’ म्हणून सर्रास ऐकू येत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून इच्छादेवी ते आकाशवाणी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे एक दिव्य बनले आहेच, पण त्याहूनही गंभीर समस्या आहे ती म्हणजे धुळीच्या साम्राज्याची. वाहने जाताच धुळीचे इतके लोट उठतात की, काही क्षणांसाठी पुढचे दिसणेही बंद होते. यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
सर्वात गंभीर प्रश्न आहे तो नागरिकांच्या आरोग्याचा. या रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिक अक्षरशः धुळीने माखत आहेत. ही धूळ इतकी जीवघेणी आहे की लोकांना सा साधा श्वास घेणे सुद्धा मुश्कील झाले आहे. ही विषारी धूळ सर्रास नागरिकांच्या नाका-तोंडात जात आहे. विचार करा, ज्या व्यक्तीला दमा (अस्थमा) किंवा श्वसनाचा आजार आहे, त्या व्यक्तीने या रस्त्यावरून प्रवास कसा करायचा? त्यांच्यासाठी हा प्रवास म्हणजे रोज मृत्यूला आमंत्रण देण्यासारखाच आहे. ही धूळ फुफ्फुसात जाऊन श्वसनाचे गंभीर आजार निर्माण करत आहे. अनेकांना ॲलर्जी, दमा आणि डोळ्यांच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील एका रस्त्याची इतकी दुरवस्था व्हावी, हे महानगरपालिका प्रशासनाचे सपशेल अपयश आहे. पण या ‘बधिर’ प्रशासनाला जनतेची भावना कशी समजणार? प्रशासकीय अधिकारी , काचा बंद असलेल्या चार चाकी गाड्यांमधून फिरतात. त्यांना या धुळीच्या नरकाची झळ कशी बसणार? सामान्य जनता, जी रस्त्याने पायी चालते किंवा दुचाकीवरून प्रवास करते, ती मात्र हा सर्व त्रास रोज भोगत आहे. त्यामुळेच, जनतेच्या वेदनेशी या अधिकाऱ्यांची नाळ तुटलेली दिसते. नागरिकांकडून कर घेणाऱ्या प्रशासनाला ही धुळफेक दिसत नाही का?
आता जळगाव जिल्ह्याला नूतन जिल्हाधिकारी लाभले आहेत. त्यांच्याकडून जळगावकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नेहमीच्या पाहणी दौऱ्यांच्या पलीकडे जाऊन, जिल्हाधिकारी या ज्वलंत प्रश्नावर तातडीने लक्ष घालतील का? महानगरपालिका असो वा सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित यंत्रणेला धारेवर धरून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ते तातडीने निर्णय घेणार का?
प्रशासनाने आता कुंभकर्णी झोपेतून जागे होण्याची वेळ आली आहे. नागरिकांना ‘गोरे’ करणारे धुळीचे रस्ते नकोत, तर सुरक्षित आणि श्वास घेण्यायोग्य स्वच्छ रस्ते हवे आहेत. अन्यथा, या धुळीत केवळ सामान्य नागरिकच ‘गोरे’ होणार नाहीत, तर प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारालाही ‘काळं’ फासलं जाईल, हे निश्चित!