बातम्या

पाण्यात पडलेल्या बाळामागे आई व मावशीही बुडाल्या – तीन जणांचा दुर्दैवी अंत!

अंजाळे, ता. यावल, जि. जळगाव (१४ एप्रिल २०२५): तालुक्यातील अंजाळे गावाजवळील तापी नदीपात्रात घडलेली एक हृदयद्रावक दुर्घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. पाण्यात बुडणाऱ्या एका पाच वर्षांच्या बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई आणि मावशीसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने अंजाळे गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

घटनेचे संपूर्ण वृत्त:

अंजाळे येथील घाणेकर नगरात राहणारा बादल लहू भील (वय २३) हा युवक जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करतो. काल त्यांच्या घरी खंडोबाच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने त्याचे नातेवाईक घरात आले होते. त्यामध्ये त्याची मावस बहिण वैशाली सतीश भील (वय २७, रा. अंतुर्ली, ता. अमळनेर) आणि मामेबहिण सपना गोपाळ सोनवणे (रा. पळाशी, ता. सोयगाव) यांचा समावेश होता.

कार्यक्रमानंतर आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हे कुटुंबीय तापी नदीवर आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यास गेले होते. यावेळी वैशाली भील यांचा पाच वर्षांचा मुलगा नकुल हा अचानक पाय घसरून नदीपात्रात पडला आणि गटांगळ्या खात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी आई वैशाली भील आणि मावशी सपना सोनवणे यांनी पाण्यात उडी घेतली. दुर्दैवाने, तिघांनाही पोहता येत नसल्याने हे सगळे पाण्यात बुडाले.

घरी धाव घेतली, परंतु उशीर झाला:

या घटनेवेळी त्यांच्यासोबत असलेली अनु सतीश भील ही बालिका घाबरून धावत घरी आली आणि घडलेला प्रकार सांगितला. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने पाण्यातून शोधमोहीम राबवली. काही वेळात तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

 

दुर्घटनेत तिघांचा मृत्यू:

या दुःखद दुर्घटनेत

वैशाली सतीश भील (वय २७, रा. अंतुर्ली, ता. अमळनेर)

नकुल बादल भील (वय ५)

सपना गोपाळ सोनवणे (रा. पळाशी, ता. सोयगाव)

या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

गावावर शोककळा:

ही घटना अत्यंत वेदनादायक असून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने अंजाळे गावात आणि मृतांच्या मूळगावी शोककळा पसरली आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!