रेल्वेत दरोडा टाकणारे आरोपी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात!
४.५० लाखांची बॅग हिसकावणारे आरोपी अखेर तुरुंगात!

जळगाव दि. १९ सप्टेंबर २०२५ –
जळगाव जिल्हा पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्थागुशा) पथकाने रेल्वेत दरोडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करत ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल रोख व एक विनानंबरची मोटारसायकल हस्तगत केली आहे. या धाडसी कारवाईमुळे रेल्वेत प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव व माल सुरक्षित राहणार असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुल गायकवाड यांना जी. एस. ग्राउंड परिसरात काही संशयास्पद इसम हालचाल करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पथक तयार करून कार्यवाहीचे आदेश दिले.
या पथकात पोउपनि. सोपान गोरे, पोहेकॉ. प्रितम पाटील, पोहेकॉ. यशवंत टहाकळे, पोकॉ. बबन पाटील, पोकॉ. सचिन घुगे, पोकॉ. प्रदीप सपकाळे व पोकॉ. मयुर निकम यांचा समावेश होता. पथकाने शोध घेता चार संशयित इसम मोटारसायकलवरून दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळण्याचा प्रयत्न करू लागले मात्र पथकाने धाडस दाखवत त्यांना पकडले.
आरोपींची ओळख
ताब्यात घेतल्यानंतर त्यांची नावे अशी उघड झाली –
- किरण पंडीत हिवरे (३२, रा. भातखेडा, ता. रावेर)
- अजय सुपडू कोचुरे (२५, रा. खिडर्डी, ता. रावेर)
- हरिष अनिल रायपुरे (२५, रा. प्रतापपुरा, बऱ्हाणपूर, म.प्र.)
- गोकुळ श्रावण भालेराव (२७, रा. डांभुर्णी, ता. यावल)
त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत मोठी रोख रक्कम आढळून आली. चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना स्थागुशा कार्यालयात आणले असता त्यांनी कबुली दिली की, दि. ०९ सप्टेंबर २०२५ रोजी रावेर रेल्वे स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी सुधाकर धनलाल पटेल (रा. बऱ्हाणपूर, म.प्र.) यांच्या डोक्यात मारहाण करून पैशांची बॅग हिसकावली होती. त्यानंतर आरोपी रेल्वेतून उतरून पळाले होते.
दरोड्यातील मुद्देमाल हस्तगत
या घटनेबाबत लोहमार्ग पोलीस ठाणे, भुसावळ येथे सीसीटीएनएस क्र. ४५२/२०२५ भा.न्या.स. २०२३ कलम ३०९(६) प्रमाणे गुन्हा दाखल होता. स्थागुशा पथकाने आरोपींच्या कबुलीनंतर ४,५०,०००/- रुपये रोख रक्कम व विनानंबरची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली. पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल लोहमार्ग पोलीस ठाणे, भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
फरार आरोपीचा शोध सुरू
या प्रकरणातील आणखी एक आरोपी संदिप उर्फ आप्पा शामराव कोळी (रा. डांभुर्णी, ता. यावल) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
वरिष्ठांचा गौरव
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
या कारवाईत पथकासोबत तांत्रिक मदत पोशि. गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी दिली.