कट्टा घेऊन फिरणारा तरुण अखेर गजाआड

दिनांक – २ जुलै २०२५ स्थानिक गुन्हे शाखा, जळगावने केलेल्या धडक कारवाईत वरणगाव पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसासह अटक करण्यात आली आहे.
जळगावचे मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते की, जळगाव जिल्ह्यातील अवैध हत्यारांचा वापर रोखण्यासाठी आणि फरार गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाई करावी. या पार्श्वभूमीवर स्थागुशाचे पोलीस अंमलदार सतर्क होते.
गुप्त माहितीवरून सापळा
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. श्रीकृष्ण देशमुख यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलगाव शिवारात एका इसमाकडे गावठी कट्टा असून, तो त्याचा दहशत माजविण्याच्या उद्देशाने वापर करत आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सोपान गोरे, श्रे.पो.उ.नि. रवि नरवाडे, पोहेको गोपाळ गव्हाळे, पो.अं. रविंद्र चौधरी यांच्या पथकाने तात्काळ कारवाईसाठी सापळा रचला.
आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद
दुपारी फुलगाव फाट्याजवळील पुलाजवळ संशयित इसम आढळून आला. पथकाने त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याजवळ गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) व ५ जिवंत पितळी काडतूस सापडले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव केशव उर्फ सोनू सुनिल भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे आहे.
मागील गुन्ह्यातही फरार
चौकशीदरम्यान उघडकीस आले की, केशव उर्फ सोनू भालेराव याच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व ३(५) नुसार गुन्हा दाखल असून, दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ पासून तो फरार होता.
सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गु.र.नं. १४८/२०२५ प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाईचे मार्गदर्शन व सहभाग
सदर कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. अशोक नखाते (अप्पर पोलीस अधीक्षक) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्वेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पुढील अधिकारी व कर्मचारी सहभागी:
- श्रे. पो.उ.नि. रवि नरवाडे
- पोहेको गोपाळ गव्हाळे
- पो.ना. श्रीकृष्ण देशमुख
- पो.अं. रविंद्र चौधरी
- (स्थागुशा, जळगाव)
One Comment