गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी गजाआड केले आहे. महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (रा. पिंप्राळा) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शनिवारी दुपारच्या सुमारास आरोपी महेंद्र सपकाळे हा पिंप्राळा येथील हुडको परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत फिरत होता. आरोपीच्या दहशतीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली, तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ गुन्हे शोध पथकाला पिंप्राळा परिसरात रवाना करण्यात आले.
पोलिसांचा शिताफीने पाठलाग
निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशानुसार पथकाने हुडको परिसरात आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महेंद्र सपकाळे पिंप्राळा रोडकडे पळू लागला. त्याच्या हालचाली पाहून नागरिकांनी पोलिसांना दिशा दाखवली. पोलिसांनी खंडेराव नगर परिसरात शिताफीने त्याला गाठत ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले.
आधीपासून गुन्हेगारांची यादीत नोंद
अटक करण्यात आलेला आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, रामानंद नगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर यापूर्वीच तब्बल ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हाणामारी, धमकी, शस्त्र बाळगणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी विशेष देखरेख ठेवली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. सचिन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपुत, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, विनोद सुर्यवंशी आणि गोविंदा पाटील यांनी धाडसी कारवाई पार पाडली.
पुढील तपास सुरू
सदरचा कट्टा व काडतूस पोलिसांनी जप्त केले असून, आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. सचिन रणशेवरे हे करीत आहेत.