यावलमध्ये भीषण अपघात! लक्झरी बस मोर नदीत कोसळली

यावल तालुका : फैजपूर-अमोदा मार्गावर रविवारी (दि. ६ जुलै) सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. इंदोरहून भुसावळकडे निघालेली खासगी लक्झरी गणेश ट्रॅव्हल्स कंपनीची बस (एमपी-३०-९००९) मोर नदीच्या पुलाजवळ १५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात १ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात?
प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मोर नदीच्या पुलावर वळणाचा अंदाज न आल्याने चालकाने बसवरचा ताबा गमावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
घटनास्थळी तातडीने बचावकार्य
अपघात घडताच परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. स्थानिक ग्रामस्थ, फैजपूर पोलिस व आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते, त्यांना स्थानिक नागरिकांनी व क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले.
जखमींना रुग्णालयात दाखल
या अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने फैजपूर येथील खाचणे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
बस हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
मोर नदीच्या पुलावरून खाली कोसळलेली बस हटवण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलिस आणि आपत्कालीन सेवा दल घटनास्थळी उपस्थित असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अपघातग्रस्त मोर नदी परिसरात अपघातांची मालिका
विशेष बाब म्हणजे, मोर नदी परिसर हा अपघातांसाठी कुप्रसिद्ध ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांत या ठिकाणी तब्बल २८ अपघात घडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.