खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते पाळधीत गणपतीची महाआरती!
१०० महिलांची उपस्थिती; स्पर्धांना महिलांचा जबरदस्त प्रतिसाद!

पाळधी (ता. जळगाव ) : गणेशोत्सवाच्या उत्साहात पाळधी येथे सूर्या फाउंडेशन संचलित महिला सक्षमीकरण केंद्र तर्फे दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीचा मान जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. स्मिताताई वाघ यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल, मा. भैरवी ताई पाटील, मा. महापौर सौ. सीमाताई भोळे, सौ. सुरभी ताई झंवर, सौ. संगीताताई कासट, सौ. मृणालताई पाटील (पारोळा), सौ. भारतीताई म्हस्के, सौ. मनीषाताई पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अर्चना सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात मोदक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांसारख्या पारंपरिक व सांस्कृतिक स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धांमध्ये एकूण २१० महिलांनी सहभाग नोंदविला. यामध्ये विजेत्या महिलांना विशेष पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना पैठणी साडी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना डिनर सेट, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना लेमन सेट देण्यात आले. तसेच, उत्तेजनार्थ गिफ्ट्स देऊन सहभागी महिलांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अकराशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या,
“आजच्या काळात आईने आपल्या मुलांना अधिक वेळ द्यावा, त्यांच्या सोबत संवाद साधावा. मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगावेत. कुटुंब आणि परिवार हा महिलांच्या उन्नतीसाठी महत्वाचा असतो. जर कुटुंबाचा पाठिंबा लाभला तर महिला कोणतीही मोठी गोष्ट यशस्वीरीत्या साध्य करू शकते.”
त्यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे महिलांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक ऐक्य बळकट होते.
कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी पार पडण्यासाठी सूर्या फाउंडेशन महिला सक्षमीकरण केंद्राच्या सर्व सभासदांनी एकजुटीने परिश्रम घेतले. हा कार्यक्रम उत्साह, श्रद्धा आणि आनंदाच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.