पालकमंत्र्यांची तातडीची मदत! वीज पडल्याने मृत मुलाच्या कुटुंबाला ४ लाख मिळाले

जळगाव तालुका धानवड येथील दुर्दैवी घटनेत शेतात काम करत असताना वीज पडून अंकुश विलास राठोड (वय १२ वर्षे) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखदायक असून गावातील नागरिकांनी तात्काळ पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांना याची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी तातडीने संबंधित तहसीलदार यांना घटनास्थळी पाठवून पंचनाम्याचे आदेश दिले.
या घटनेनंतर पालकमंत्री यांच्या हस्तक्षेपामुळे आणि प्रयत्नांमुळे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पीडित कुटुंबाला ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. ही मदत रक्कम दिनांक ३ जून २०२५ रोजी मृत मुलाच्या आई, सौ. सनंतरा बाई विलास राठोड यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी जळगाव तालुका शिवसेना प्रमुख श्री. शिवराज रावसाहेब पाटील, तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास शिवाजी राठोड, शिवाजी जगराम राठोड, रुपंचद राठोड आणि धर्मा चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करून कुटुंबाला दिलासा मिळवून दिला.
या घटनेमुळे संपूर्ण धानवड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून तत्परतेने दिलेल्या मदतीमुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला असला तरी, अपूर्ण झालेलं आयुष्य आणि गमावलेला मुलगा याची भरपाई कधीच होऊ शकणार नाही, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.