गोळीबाराची धक्कादायक घटना : तरुणावर हल्ला, गंभीर जखमी

जळगाव, दि. २४ एप्रिल २०२५ –जळगाव शहरातील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्ससमोर, मू. जे. महाविद्यालयाच्या मागील बाजूस गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (वय २२, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) या तरुणावर अज्ञात इसमांनी गोळीबार केला असून तो गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोळी कमेरेच्या हाडात अडकली असून जखमीला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वादाचे पडसाद : राम नवमीप्रसंगी निर्माण झाला होता वाद
महेंद्र सपकाळे याचा काही तरुणांशी राम नवमीच्या दिवशी नाचण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वाद उफाळून आल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता.
वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार
गुरुवारी रात्री भूषण अहिरे याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी महेंद्र सपकाळे हा गेला असता त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी ३ ते ४ बंदुका व धारदार शस्त्रांचा वापर करत बऱ्याच राउंड फायर केले.
धावत पळून घरात लपल्यामुळे वाचला जीव
हल्ल्यावेळी महेंद्रने पळ काढत जवळच्याच एका घरात आश्रय घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, पळताना त्याला एका गोळीचा लागलेला घाव बसला आहे.
पोलिसांची तत्काळ कारवाई व तपास
घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, जिल्हापेठ पोलीस व गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करताना दोन काडतूस व एका संशयिताच्या घरी तलवार सापडल्याची माहिती दिली आहे.
हल्लेखोरांची माहिती मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे
जखमी महेंद्र सपकाळे आणि त्याच्या मित्रांनी हल्ला विशाल कोळी, बाबू धोबी व अन्य काही व्यक्तींनी केल्याचे पोलिसांना सांगितले असून, या अनुषंगाने अधिक तपास सुरू आहे.