तुरखेडा गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व डिजिटल शिक्षणासाठी संगणक-प्रोजेक्टर भेट
तुरखेडा शाळा डिजिटल – विद्यार्थ्यांना मिळणार नवे शिक्षण

श्री मराठी न्युज तुरखेडा (ता. जळगाव) :१ ५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने तुरखेडा गावात मोठ्या उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. सरपंच सौ. मंगला पंढरीनाथ सपकाळे यांच्या शुभहस्ते गावात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद शाळा, तुरखेडा येथे छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणात, सरपंच सौ. मंगला ताई सपकाळे व ग्रामपंचायत सदस्य नितीन भाऊ सपकाळे यांच्या हस्ते मराठी शाळेला एक संगणक व प्रोजेक्टर भेट देण्यात आला. तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्पेशल वर्गांचे रिबिन कापून उद्घाटनही करण्यात आले.
🎯 डिजिटल शिक्षणाचा उद्देश
गावातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना बालपणापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाशी ओळख करून देणे, तसेच ज्ञानात नवनवीन भर पडावी यासाठी ही भेटवस्तू दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. संगणक व प्रोजेक्टरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ होणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपसरपंच श्री. निवृत्ती पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. गिरीश भाऊ सपकाळे, श्री. निंबा कोळी, श्री. राजेंद्र सपकाळे तसेच ग्रामसेवक पल्लवी मोरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेचे आयोजन
कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय पाटील सर, सौ. अनिता सोनवणे मॅडम व सौ. अशा सपकाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.तुरखेडा ग्रामस्थांनी एकदिलाने कार्यक्रमाला हजेरी लावून शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.