संजय पवार यांची जळगाव जिल्हा सहकारी क्षेत्रात बिनविरोध निवड

2025 ते 2030 या कालावधीसाठी होऊ घातलेल्या जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन आणि जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थांच्या सुरू असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे फक्त संजय पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याकारणाने दोन्ही संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय जी पवार यांची अविरोध निवड करण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्हा सहकार बोर्ड ही अनेक वर्षांपासूनची संस्था आहे. सदर संस्थेचे कामकाज म्हणजे जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणे, विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये कार्यरत असलेल्या गटसचिवांना प्रशिक्षण देणे हे काम सहकार बोर्डामध्ये पूर्वीपासून केले जात आहे. तसेच या संस्थेमध्ये जळगाव जिल्ह्यातील मान्यवर जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा सहभाग असायचा.
जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन या संस्थेला देखील मोठा इतिहास आहे. सहकार बोर्डाची स्थापना 1948 साली झाली असून संस्थेचे पहिले अध्यक्ष रावबहादूर स्वर्गीय वामनराव सावंत होते. त्यानंतर स्वर्गीय व्यंकटराव भघाजी पाटील, स्वर्गीय माजी आमदार भाऊसाहेब टी. टी. साळुंखे, स्वर्गीय माधवराव गोटू पाटील (माजी आमदार), स्वर्गीय बापूराव हिम्मतराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली होती. सध्या विद्यमान अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक प्रदीप दादा देशमुख हे कार्यरत आहेत.
जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन या संस्थेची स्थापना देखील 1948 साली झाली होती. या संस्थेचे संस्थापक चाळीसगाव तालुक्यातील स्वर्गीय रामराव जीभाऊ पाटील हे होते. त्यानंतर या संस्थेत स्वर्गीय दामू भाऊ पांडू पाटील, स्वर्गीय उदयसिंग अण्णा पवार या मान्यवरांनी देखील अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली होती. सध्या विद्यमान अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय जी पवार कार्यरत आहेत.
या सहकारी संस्थेत देखील जळगाव जिल्ह्यातील सहकार महर्षी मान्यवरांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या दोन्ही संस्थांच्या संचालकपदी भाऊसाहेब संजय पवार यांची सहकार क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, जळगाव जिल्हा सहकार बोर्ड, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, जळगाव जिल्हा पीक संरक्षण फेडरेशन, जळगाव जिल्हा देखरेख सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन अशा विविध शेतकरी आणि सहकारी संस्थांमध्ये संजय पवार कार्यरत आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल सदर संस्थांच्या सभासदांनी अभिनंदन केले आहे.