बातम्या

निलंबित पोलिसाचा प्रताप! सराफाकडून ७३ तोळे सोने आणि १७ लाखांची फसवणूक

पुणे – पुणे पोलिस दलातील निलंबित पोलीस कर्मचारी गणेश अशोक जगताप यांच्या कथित फसवणुकीने संपूर्ण पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. पोलीस दलात कार्यरत असूनही स्वतःवर बँक कर्ज मिळत नाही, जमीन विक्रीचा व्यवहार प्रलंबित आहे, आणि सोने गहाण ठेवले आहे, अशा बनावटी कारणांचा आधार घेत जगताप यांनी एका सराफ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून ७३.५ तोळे सोने आणि तब्बल १७ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विश्वासाला तडा, लाखो रुपयांची फसवणूक

फिर्यादी आणि जगताप हे पूर्वीपासून एकमेकांच्या ओळखीचे होते. या नात्याचा फायदा घेत जगताप यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला विश्वासात घेऊन, “मी पोलीस खात्यात असल्यामुळे माझ्या नावावर कर्ज मिळत नाही. माझ्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे. लवकरच ती विकली जाणार असून, त्या व्यवहारातून तुमचे सर्व पैसे आणि दागिने परत करेन,” असे आश्वासन दिले होते.

त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने २०१९ मध्ये दोन टप्प्यांत ७३.५ तोळे सोने दिले. पहिल्या टप्प्यात २६ ऑक्टोबर २०१९ रोजी २४.६ तोळे आणि दुसऱ्या टप्प्यात २ जानेवारी २०२० रोजी ४८.९ तोळे सोने दिले. यासोबतच वेळोवेळी रोख रक्कम आणि धनादेशाद्वारेही मदत करण्यात आली. मात्र, या सर्व रकमेची परतफेड झाली नाही.

आणखी एका सराफाला देखील फसवले

फसवणुकीचा हा प्रकार इथेच थांबला नाही. २०२४ मध्ये पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली होऊनही अनुपस्थित राहणाऱ्या जगताप यांनी औंध भागातील दुसऱ्या एका सराफाला देखील गंडा घातला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव वापरून त्यांनी सराफाकडून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने घेतले. जेव्हा सराफाने पैसे मागितले, तेव्हा जगताप यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणामुळे विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी त्यांचे निलंबन केले.

राष्ट्रपती पदकासाठी देखील खोटे दस्तऐवज

फसवणुकीची मालिका यापूर्वीही सुरू होती. २०२१ मध्ये राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी त्यांनी शासकीय सेवा पुस्तकातील नोंदी बनावट केल्या, खोटे दस्तऐवज तयार केले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या व शिक्के वापरले. हे सर्व करताना त्यांनी वेतनवाढीबाबत झालेली नकारात्मक कारवाई रेकॉर्डमधून गायब केली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात जगताप यांच्यासह दोन लिपिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता काय पुढे?

फिर्यादीने वारंवार मागणी करूनही सोने आणि पैसे परत न मिळाल्याने अखेर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याचा असा गैरप्रकार समोर आल्याने पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!