बातम्या

कॉपी पुरविणाऱ्या टोळीवर कडक कारवाई – शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई

जळगाव : इयत्ता दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शनिपेठ पोलिसांनी कॉपी पुरविणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली. परीक्षेसाठी बाहेरून उत्तरपत्रिका पुरवणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे.

माहितीनुसार, 21 फेब्रुवारी 2025 रोजी काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्युनियर कॉलेज, जळगाव येथे मराठी विषयाचा पेपर सुरू असताना पोलीस बंदोबस्त तैनात होता. यादरम्यान, शाळेच्या मागील बाजूस, गोपाळपुरा भागातून शाळेच्या कंपाउंड वॉलवरून आत आलेल्या दिगेंद्र भरतसिंग पाटील (18, रा. मन्यारखेडा) व त्याच्या सोबतच्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात A4 साईजच्या चिठ्ठ्या सापडल्या, ज्यावर हस्तलिखित व टंकलिखित स्वरूपात मराठी विषयाच्या प्रश्नोत्तरांचा मजकूर होता. चौकशीअंती त्यांनी या चिठ्ठ्या परीक्षेला बसलेल्या भावांसाठी आणल्याची कबुली दिली.

तपासातून उघड झालेली संगणमत

पोलिसांच्या तपासात उघडकीस आले की, सदर प्रश्नोत्तरे राहुल रविंद्र कोळी (30, रा. नशिराबाद) याने उपलब्ध करून दिली होती. दिगेंद्र पाटीलने ती सागर नारायण बारी (23, रा. श्रीकृष्णनगर) याला पीडीएफ स्वरूपात पाठवली. सागर बारीने जळगावच्या गुरुकुल कॉम्प्युटर्स या इन्स्टिट्यूटमधील संगणकावर प्रश्नोत्तरांचा मजकूर छोट्या फॉन्टमध्ये टंकलिखित करून पीडीएफ तयार केली.

 

नंतर, ही फाइल दिगेंद्र पाटीलला व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्यात आली. त्यानंतर, किरण नंदलाल परदेशी (28, रा. ढाकेवाडी) याच्या राज मोबाईल, नेरी नाका या दुकानातून या पानांचे प्रिंटआउट काढण्यात आले. पोलिसांनी वेळीच कारवाई करून या टोळीचा पर्दाफाश केला.

 

गुन्हा दाखल – एक आरोपी फरार

 

शनिपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ अधिनियम 1982 च्या कलम 7 व 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रविंद्र कोळी हा फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

धडक पोलिस कारवाई

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रिया दातीर, पोहवा गिरीश पाटील, पोहवा उमेश ठाकुर, मपोहवा प्रतिभा पाटील, पोना भागवत शिंदे तसेच होमगार्ड अनिल पाटील, किशोर कापुरे व उमाकांत कोळी यांनी केली.

पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार, पुढील परीक्षांसाठी सुरक्षा अधिक कडक करण्यात येणार असून, कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवले जाणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!