धक्कादायक! तलाठी आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला

पुणे | जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोकण कड्यावरून उडी मारून तलाठी आणि एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे. मृत व्यक्तींची ओळख अहिल्यानगर तालुक्यातील श्रीगोंदा येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि जुन्नर तालुक्यातील आंबोली गावातील अल्पवयीन मुलगी अशी झाली आहे. सदर मुलगी ही रामचंद्र पारधी यांची नात्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या आठवड्याभरापासून दोघेही बेपत्ता
दोघेही गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता होते. त्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक चिंतेत होते. दरम्यान, रामचंद्र पारधी यांची गाडी गेल्या तीन-चार दिवसांपासून जुन्नरमधील आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावर उभी असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्याठिकाणी एक जोड चपला आढळल्यामुळे ग्रामस्थांचा संशय वाढला. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली.
बाराशे फुट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढले
ग्रामस्थांच्या मदतीने आणि संशयावरून कोकण कड्याच्या दरीत शोधमोहीम हाती घेण्यात आली. या शोधात जवळपास 1200 ते 1350 फुट खोल दरीत दोघांचेही मृतदेह आढळले. मुलीचा मृतदेह सुमारे 1200 फूट खोल, तर रामचंद्र पारधी यांचा मृतदेह 1350 फूट खोल दरीत सापडला.
या घटनेनंतर जुन्नर पोलिस ठाण्याला कळवण्यात आले. तत्काळ शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या १६ सदस्यीय पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत कठीण आणि खडतर परिस्थितीत दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले.
आत्महत्या की आणखी काही?
या प्रकरणाबाबत प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, अंतिम निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलीस तपास सुरु
सध्या जुन्नर पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत्यूचे कारण, मृतांमधील नातेसंबंध, सामाजिक किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी, तसेच कोणत्याही प्रकारचा दबाव अथवा गैरवर्तन याबाबत तपास सुरू आहे.
या धक्कादायक घटनेमुळे जुन्नर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एक अधिकाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू होणे आणि त्यासोबत अल्पवयीन नातेवाईकाचा समावेश असणे, ही बाब समाजमनाला हादरवणारी आहे.