खर्दे गावाचा सरपंच पती सट्टा जुगारात रंगेहाथ पकडला! पोलिसांची धडक कारवाई

अमळनेर (जळगाव) | ६ ऑगस्ट २०२५
अमळनेर शहरातील मच्छीमार्केटच्या मागे, भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या ‘कल्याण बाजार’ नावाच्या सट्टा जुगारावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकून खर्दे गावातील सरपंच यांच्या पतीला अटक केली आहे. या कारवाईत सट्टा खेळण्यासाठी वापरला जात असलेला मोबाइल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील मच्छीमार्केटच्या मागील भिंतीच्या आडोशाला काशीनाथ गोपीचंद पाटील नावाचा एक इसम मोबाइलवरील ‘कल्याण बाजार’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर आकडे घेऊन लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगाराचा खेळ खेळत आणि खेळवत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आत्रीकर सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी तातडीने कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस पथक मच्छीमार्केटकडे रवाना झाले.
बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता पोलिसांनी छापा टाकून काशीनाथ गोपीचंद पाटील याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव काशीनाथ गोपीचंद पाटील (वय ४०, रा. खरर्दे, ता. धरणगाव) असे असल्याचे त्याने सांगितले. तपासादरम्यान, तो खर्दे गावाचा सरपंच असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाइल जप्त केले आहेत.
पोलिसांनी त्याचा व्हीओ कंपनीचा जांभळ्या व काळ्या रंगाचा मोबाइल ताब्यात घेऊन तपासला असता, मोबाइलमधील व्हॉट्सॲपद्वारे वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अंक आणि आकड्यांवर पैसे स्वीकारल्याच्या आणि पाठवल्याच्या पावत्या दिसून आल्या. पोहेकॉ विनोद सोनवणे यांनी पंचासमक्ष जागीच लॅपटॉपवर या सर्व कारवाईचा सविस्तर पंचनामा केला. आरोपीला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पो.ना. जिलेद निकुंभे, पोहेकॉ विनोद सोनवणे, पोकॉ अमोल पाटील आणि पोकॉ मयूर पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.