फुलगाव ग्रामपंचायतीचे विकासकामे २ वर्षांपासून ठप्प;– आंदोलनाचा इशारा
फुलगाव ग्रामपंचायत आंदोलनाच्या उंबरठ्यावर

फुलगाव , ता. भुसावळ :तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतीत मागील दोन वर्षांपासून कोणतीही ठोस विकासकामे झालेली नाहीत. यामागे ग्रामपंचायतीतील विरोधी गटाकडून हेतुपुरस्सर अडथळा आणला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील आणि कविता चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
विकासकामे मुद्दाम ठप्प : सदस्यांचा संताप
ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की,
“हा विषय अत्यंत गंभीर असून विशेषतः वार्ड क्र. २ मध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी असलेली विकासकामे मुद्दाम थांबवली जात आहेत. वार्डातील रस्ते, गटारे, पिण्याच्या पाण्याची सोय, वीजपुरवठा या समस्या गंभीर आहेत. मी वारंवार पाठपुरावा करूनही निधी मंजूर केला जात नाही. काही सदस्य जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत आहेत.”
त्यांनी पुढे म्हटले की,
“जनतेने आम्हाला गावाच्या विकासासाठी निवडून दिले आहे. मात्र काही जण केवळ स्वतःचा राजकारण व वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी विकासकामांना अडथळा आणत आहेत. यातून सामान्य जनता त्रस्त झाली आहे. ही भूमिका म्हणजे लोकशाहीचा अपमान असून, जनतेच्या मताचा अवमान आहे. जनतेच्या पैशातून गावात विकासकामे व्हायची आहेत; पण राजकीय मतभेदामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. हा अन्याय मी सहन करणार नाही, सत्य जनतेसमोर यावे यासाठी मी कटिबद्ध आहे.”
कविता चौधरींची प्रतिक्रिया
ग्रामपंचायत सदस्या कविता चौधरी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले,
“गावातील सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. परंतु स्वार्थी राजकारण आणि विरोधी गटाचे हेतुपुरस्सर अडथळे यामुळे ग्रामपंचायतीची कामे ठप्प झाली आहेत. हा प्रकार संपूर्ण गावाच्या हिताला मारक आहे.”
शासनाचे नियम आणि ग्रामपंचायतीची कर्तव्ये
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार ग्रामपंचायतीवर खालील जबाबदाऱ्या आहेत :
-
ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करून नागरिकांना रस्ते, पाणी, गटारे, वीज, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणे.
-
विकासकामांसाठी शासनाकडून मिळालेला निधी अडवणे किंवा हेतुपुरस्सर थांबवणे हे बेकायदेशीर असून, अशा कृत्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
-
ग्रामपंचायत सदस्यांनी मतभेद बाजूला ठेवून लोकहितासाठी काम करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.
म्हणूनच, फुलगाव ग्रामपंचायतीतील विकासकामे मुद्दाम ठप्प ठेवणे हा ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग असून, यामुळे संपूर्ण गावाच्या विकास प्रक्रियेला अडथळा निर्माण होत आहे.
- ग्रामपंचायतीचा कारभार हा सरपंचांच्या नेतृत्वाखाली चालतो. अशा वेळी दोन वर्षे गावात विकासकामे ठप्प असताना सरपंचांनी याबाबत ठोस पावले का उचलली नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- “गावातील विकास ठप्प, पण सरपंच मात्र गप्प” अशी भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
- ग्रामपंचायतीतील विकासकामे थांबलेली असताना सरपंचांनी शासनाकडे ठोस पाठपुरावा केला का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.?
- “जनतेचे प्रश्न अनुत्तरीत ठेवून सरपंच शांत बसले आहेत. ही भूमिका म्हणजे जबाबदारी टाळण्यासारखी आहे. लोकप्रतिनिधींनी मौन बाळगणे हा गावाच्या विश्वासाचा विश्वासघात आहे.”
आंदोलनाचा इशारा : “जनतेचा आवाज दाबला जाणार नाही”
सचिन पाटील यांनी ठाम शब्दांत इशारा दिला की,
“जर विकासकामे तात्काळ सुरू झाली नाहीत तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. गावाचा विकास थांबवण्याचा प्रयत्न जोपर्यंत केला जाईल, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. जनतेचा आवाज दाबला जाणार नाही. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी मी लढत राहीन.”