दरोडेखोरांचा थरार! पोलिसांचा इनोव्हा कारचा जीवघेणा पाठलाग

दि. १५/०६/२०२५ रोजी रात्री ११.०० ते दि. १६/०६/२०२५ रोजी सकाळी ०५.०० या कालावधीत स्थानीक गुन्हे शाखा, जळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, श्रेपोउनि. अनिल जगन्नाथ जाधव आणि शासकीय वाहन चालक पोहेकॉ. दर्शन हरी ढाकणे हे जिल्हा गस्त पेट्रोलिंगसाठी रवाना झाले होते.
गस्ती दरम्यान भुसावळ उपविभागातून पेट्रोलिंग करत मुक्ताईनगर उपविभागात दाखल झाल्यावर अंतुर्ली ते डोलारखेडा रस्त्यावर पोलीस पथक फिरत असताना मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंड गावाजवळ एक इनोव्हा कार थांबून चार जण एका घराकडे जाताना आढळले. पोलीस वाहन दिसताच हे चारही इसम परत इनोव्हा कारमध्ये बसून डोलारखेडा फाट्याद्वारे नागपूर महामार्गावरून भरधाव वेगाने पसार झाले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांनी शासकीय वाहन चालक पोहेकॉ. ढाकणे यांना पाठलाग करण्यास सांगितले. पाठलाग सुरू असताना इनोव्हा कारच्या चालकाने शासकीय वाहनाला कट मारून पोलिसांच्या जीविताला धोका निर्माण केला. यामुळे श्री. पाटील यांनी मलकापूर, नांदुरा, बुलढाणा, अकोला या ठिकाणी कंट्रोल रूमशी संपर्क साधून नाकाबंदी करण्याचे निर्देश दिले.
दि. १६/०६/२०२५ रोजी सकाळी ०३.४० वाजता रिधोरा, ता. बाळापूर, जि. अकोला येथे नागपूर-धुळे महामार्गावर NHAI ऑफिसजवळ ट्रक आडवा लावून अकोला शहरातील डिव्हिजन गस्तीच्या पथकाने नाकाबंदी केली. यावेळी इनोव्हा कार हळूहळू येऊन बंद पडली. पोलिसांनी कारमधील चार जणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते दरवाजे उघडून पळून गेले.
जुने शहर पोलीस स्टेशन अकोला येथील पोउनि. रविंद्र करणकर, पोहेकॉ. प्रमोद शिंदे, पोकों. स्वप्नील पोधाडे यांनी त्यांच्या पाठलागाचा प्रयत्न केला, मात्र आरोपी फरार झाले. इनोव्हा कारचा चालक अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. खदान, हैदरपुरा, आलीम चौक, अकोला) याला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले.
सदर कारमधून पोलिसांनी एक काळ्या रंगाचा चोरीचा बैल, १ तलवार, १ गुप्ती, १ चाकू, १ लोखंडी रॉड, २ दोर, कपडे व अन्य दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत केले. सर्व साहित्य जुने शहर पोलीस स्टेशन अकोला येथे पंचनामा करून जप्त करण्यात आले.
या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीसह खालील आरोपींचा समावेश आहे:
1. अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. अकोला)
2. सैय्यद फिरोज ऊर्फ अनडूल सैय्यद झहीर (रा. अजुमपुरा, कसारखेडा, बाळापुर)
3. अफजल सैय्यद (पूर्ण नाव माहिती नाही, रा. काली घाणी पुरा, बाळापूर)
4. इमरान (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बिकुंड नदी, कसारखेडा, बाळापूर)
5. तन्नु ऊर्फ तन्वीर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. काली घाणी, बाळापूर)
6. अफरोज खान ऊर्फ अप्या (रा. कुबा मशिद, अकोट फाईल, अकोला)
सदर टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. कृष्णांत पिंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहभाग घेतलेल्या अधिकाऱ्यांत श्री. संदीप पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), पोउनि. शरद बागल, श्रेपोउनि. अनिल जाधव, पोहेकॉ. दर्शन ढाकणे, सफौ. रवि नरवाडे, पोहेकॉ. सुनिल दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, पोना. श्रीकृष्ण देशमुख, पोहेका. भरत पाटील यांचा समावेश होता. तसेच अकोला येथील पोउनि. रविंद्र करणकर, पोहेकॉ. प्रमोद शिंदे, पोकों. स्वप्नील पोधाडे यांनी चोख कामगिरी बजावली.
मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.