रामराव तायडे यांना राष्ट्रीय कामगार भूषण पुरस्काराने सन्मान

जळगाव, दि. २७ जुलै २०२५ — जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवणारी एक अत्यंत प्रतिष्ठेची घटना नुकतीच कोल्हापूर येथे पार पडली. जळगाव येथील रहिवासी व सध्या हिताची अस्मेटो प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये कार्यरत असलेले श्री. रामराव सीताराम तायडे यांना राष्ट्रीय कामगार भूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देशभरातील विविध औद्योगिक क्षेत्रात अपूर्व कार्य करणाऱ्या गुणवंत कामगारांना दिला जातो. श्री. तायडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कार्यकुशलतेने, प्रामाणिकपणाने व सामाजिक जाणिवांनी औद्योगिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आला.
हा पुरस्कार समारंभ २७ जुलै रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे अत्यंत भव्य व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, डॉ. रविकांत पाटील, तसेच ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. तायडे यांच्या या यशामुळे संपूर्ण कामगार वर्गात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनीही या गौरवाने हर्षोल्हास व्यक्त केला आहे.
रामराव तायडे यांचे कार्य
श्री. तायडे हे अनेक वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी गुणवत्तापूर्ण सेवा, निष्ठा, शिस्त आणि सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात विशेष योगदान दिले आहे. त्यांचे योगदान केवळ उद्योगपुरते मर्यादित नसून, सामाजिक कार्यातही ते सक्रीय आहेत.