जळगावात देहव्यवसायाचा पर्दाफाश! बांगलादेशी तरुणीची सुटका, महिला अटकेत

जळगाव प्रतिनिधी | श्री मराठी न्यूज जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथे चालवण्यात येणाऱ्या वेश्या व्यवसायाच्या गोरखधंद्यावर पोलिसांनी धाड टाकून पर्दाफाश केला आहे. या धाडीत २५ वर्षीय बांगलादेशी तरुणीची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालवणारी पूजा आत्माराम जाधव (वय २७) हिला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवार, दि. २३ जुलै २०२५ रोजी करण्यात आली.
सामाजिक संस्थेकडून मिळालेली माहिती गंभीरतेने घेतली पुणे येथील एका सामाजिक संस्थेने जळगावातील देहव्यवसायाबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे दिली होती. त्यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) यांना तपासाचे आदेश दिले. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक आणि जिल्हापेठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई करण्यात आली.
संशयित घरावर छापा; बांगलादेशी तरुणीची सुटका संशयास्पद हालचालींचा तपास घेत प्रोफेसर कॉलनीतील एका घरावर पथकाने छापा टाकला. त्या वेळी पूजा जाधव हिने दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी स्वत:ची ओळख सांगून घराची झडती घेतली. तेव्हा २५ वर्षीय बांगलादेशी तरुणी आढळून आली.
तिच्याकडून माहिती घेतली असता, २३ जुलै रोजी नाशिक रेल्वे स्थानकावर असताना पूजा जाधवने तिला नोकरीचे आमिष दाखवून जळगावला आणले आणि इथे जबरदस्तीने देहव्यवसायासाठी भाग पाडल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला.
गुन्हा दाखल, मुद्देमाल जप्त पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत संबंधित मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल अश्विनी सावकारे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची संयुक्त कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, नितीन बाविस्कर, जिल्हापेठ निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस हेडकॉन्स्टेबल भारती देशमुख आदींच्या पथकाने केली.