बातम्या

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दिपेश पाटील यांची ‘छावा’ चित्रपट शाळा-महाविद्यालयांत मोफत दाखवण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये मोफत दाखवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे विभागीय समन्वयक दिपेश समाधान पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांना पत्र पाठवले असून, विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण करून त्यांना प्रेरणा मिळावी, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मागणीमागील कारणे:

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक:

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, त्यांचे कार्य आणि विचार संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत. आजच्या तरुणाईने त्यांच्या ध्येय, संघर्ष आणि शौर्याची जाणीव ठेवावी, यासाठी हा चित्रपट शाळा व महाविद्यालयांमध्ये दाखवणे आवश्यक आहे.

2. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होईल:

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक अडचणींवर मात करत स्वराज्य निर्माण केले. त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे विद्यार्थीही त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन मोठी स्वप्ने पाहतील आणि त्यासाठी मेहनत करतील.

3. युवा पिढीत आत्मविश्वास निर्माण होईल:

सध्याच्या काळात तरुण पिढी शैक्षणिक दडपण, स्पर्धा आणि करिअरच्या टेन्शनमुळे नैराश्याच्या गर्तेत जात आहे. काही जण टोकाचे निर्णय घेत आहेत. छावा चित्रपट बघून त्यांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानता संघर्ष करण्याची जिद्द निर्माण होईल.

4. महिलांच्या सन्मानाबाबत जागरूकता:

छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांसाठी आदर्श होते. त्यांनी स्त्रियांवरील अन्याय थांबवण्यासाठी कठोर धोरणे राबवली. आजच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढत असताना, मुलांमध्ये स्त्रियांबद्दल सन्मान आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण होण्यासाठी हा चित्रपट उपयुक्त ठरेल.

5. महाराष्ट्राची एकजूट आणि संस्कृती जोपासण्यास मदत होईल:

छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राची एकजूट टिकवून ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून तरुणांनी समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा घ्यावी, हा या मागणीमागील महत्त्वाचा उद्देश आहे.

शासनाने पुढाकार घ्यावा:

महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये छावा चित्रपट मोफत दाखवण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि निधी उपलब्ध करून द्यावा.

शासनाच्या निर्णयाकडे लक्ष:

या मागणीला शासन सकारात्मक प्रतिसाद देईल अशी अपेक्षा असून, मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे विभागीय समन्वयक दिपेश समाधान पाटील यांनी केली आहे.

– प्रतिनिधी चोपडा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!