गिरणा नदीच्या किनारी सापडला मानवी सांगाडा; आमोदा बुद्रुकमध्ये खळबळ

जळगाव (दि. १९ एप्रिल) – जळगाव तालुक्यातील आमोदा बुद्रुक गावात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गिरणा नदीच्या काठावर एक मानवी सांगाडा आढळून आला आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. सांगाडा सुमारे ६० ते ६५ वयोगटातील पुरुषाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गावातील काही ग्रामस्थांना नदीकिनारी संशयास्पद वस्तू दिसल्याने त्यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील यांना कळवले. पोलीस पाटलांनी ही माहिती जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अहिरे व हेकॉ किरण आगोणे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन बोलावण्यात आली आणि सांगाड्याच्या ठिकाणी तपास करण्यात आला. फॉरेन्सिक पथकाने सांगाड्यावरून डीएनए चाचणीसाठी आवश्यक नमुने घेतले असून, ते सुरक्षितपणे गोळा करण्यात आले आहेत.
घटनास्थळी सांगाड्याचे डोके, छातीचा भाग, एक हात व एक पाय असा भाग आढळून आला आहे. याशिवाय काही फाटलेले व खराब झालेले कपड्यांचे तुकडेही सापडले आहेत. यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवणे सध्या कठीण जात आहे.
सांगाडा पुढील तपासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस विविध अंगांनी तपास करत असून, हा मृत्यू अपघाती आहे की आत्महत्या किंवा घातपात, हे स्पष्ट होणे बाकी आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पोलिसांकडून सांगाड्याची ओळख पटवण्याचा तसेच मृत्यूचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत राहा!