जळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी पदभार स्वीकारला
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांसोबत सदिच्छा भेट, प्रशासकीय कामकाजाची आढावा बैठक पार

जळगाव (प्रतिनिधी) –जळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून भा.प्र.से. अधिकारी श्री. रोहन घुगे यांनी आज (दि. ९ ऑक्टोबर) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🌸
पदभार स्विकारल्यानंतर श्री. घुगे यांनी जिल्ह्यातील महसूल अधिकारी व प्रशासकीय अधिकार्यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील चालू प्रशासकीय कामकाज, महसूल विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच जनसामान्यांशी संबंधित नागरिकाभिमुख उपक्रमांची माहिती त्यांनी सविस्तर जाणून घेतली.
नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी वर्गाशी संवाद साधताना सांगितले की, “जिल्ह्यातील विकासकामे, शासकीय योजना आणि नागरिक सेवांना गती देणे हे प्राधान्य असेल. पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन हीच आपली दिशा असेल.” असे मत त्यांनी व्यक्त केले.