यावल तालुक्यात थरार! हॉटेल मालकावर थेट गोळीबार

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील आडगाव मनुदेवी फाट्यावर गुरुवारी (दि. १० जुलै) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रायबा हॉटेलमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. हॉटेल रायबा येथे दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी थेट हॉटेल मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०, रा. पुनगाव, ता. यावल) यांच्यावर गोळीबार केला.
► दोन गोळ्या झाडून फरार
प्राप्त माहितीनुसार, रायबा हॉटेल ही प्रमोद बाविस्कर यांनी सहकाऱ्यांसह भाड्याने घेतलेली आहे. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून हॉटेलवर आले. त्यांच्यात आणि बाविस्कर यांच्यात काहीसा वाद झाल्यानंतर अचानक गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी प्रमोद बाविस्कर यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये एक गोळी त्यांच्या छातीत, तर दुसरी खांद्यावर लागली. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
► गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल
प्रमोद बाविस्कर हे गंभीर जखमी अवस्थेत असून, तातडीने त्यांना जळगाव येथील अरुश्री या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. शरीरात गोळ्या असल्याने स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी दिली आहे.
► यावल पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस हवालदार वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी, मुकेश पाटील, किशोर परदेशी यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, एक रिकामे काडतूस जप्त करण्यात आले आहे.
► वादाचे कारण अद्याप अस्पष्ट
गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, जुना वाद किंवा वैयक्तिक शत्रुत्वातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे.
► परिसरात दहशत
मनुदेवी फाटा हा यावल तालुक्यातील महत्त्वाचा आणि गजबजलेला परिसर आहे. या भागात अशा प्रकारचा गोळीबार झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे.
► पुढील तपास पोलीस करत आहेत
या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.