बातम्या

जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा ?, दिवाळीनंतर लागणार आचारसंहिता?

नोव्हेंबर-जिल्हा परिषद, डिसेंबर-नगरपालिका, जानेवारी-महापालिका – निवडणुकांचा धडाका सुरू!

जळगाव | ४ ऑक्टोबर २०२५ लोकसभा किंवा विधानसभेपेक्षा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांची खरी परीक्षा असते, असे स्पष्ट करत भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखांबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा आज (४ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे, तर दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होईल, असा मोठा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

भाजपच्या “विजयी संकल्प मेळाव्या”त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी निवडणुकीच्या तयारीला तत्काळ लागण्याचे आवाहन केले.


🗳️ नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद, डिसेंबरमध्ये नगरपालिका, जानेवारीत महापालिका निवडणुका

चंद्रकांत पाटील म्हणाले,

“दिवाळीनंतरची पहिली निवडणूक ही जिल्हा परिषदेची होईल. ती नोव्हेंबरच्या शेवटी पार पडेल. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटी नगरपालिकांच्या निवडणुका होतील. आणि जानेवारीच्या शेवटी बहुप्रतीक्षित महापालिका निवडणुका होणार आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, काही जण म्हणतात की माझा निवडणूक आयोगावर कंट्रोल आहे, पण तसे नाही. “मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे, त्यामुळे अनुभवाच्या आधारे अंदाज व्यक्त केला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


🤝 महायुतीकडून ‘मैत्रीपूर्ण’ लढत

महायुतीच्या सामूहिक निवडणूक लढाईबाबत बोलताना पाटील म्हणाले,

“निवडणुका आपण महायुती म्हणूनच लढवणार आहोत. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ज्या जागा मागत आहेत, तिथे आपला उमेदवार अधिक मजबूत असेल, तर आपण ‘मैत्रीपूर्ण’ लढत देऊ.”

त्यांनी स्पष्ट केलं की, आघाडीच्या नावाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. “कार्यकर्त्यांचा बळी देणारी लढाई आम्ही करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.


📞 कार्यकर्त्यांना ‘संपर्क वाढवा’चा कानमंत्र

कार्यकर्त्यांना प्रेरणा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले,

“२०१९ साली बावनकुळे यांचे तिकीट नाकारले गेले होते, आणि आज तेच बावनकुळे २०२४ मध्ये उमेदवारीचे अधिकार मिळवतात. राजकारणात प्रयत्नांसोबत नशिबाची साथही लागते. त्यामुळे नाराज न होता काम करत राहा.”

त्यांनी पुढे सांगितले की, “येणाऱ्या दिवाळीचा काळ लोकांना भेटण्यासाठी आणि मतदारसंघात संपर्क वाढवण्यासाठी उपयोगात आणा,” असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.


🏛️ “उद्धव ठाकरे थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर…”

२०१९ च्या राजकीय उलथापालथीवर भाष्य करताना पाटील म्हणाले,

“नियती ही नियतीच असते. २०१९ साली सरकार जाणं हा नियतीचा खेळ होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोडा समजूतदारपणा दाखवला असता, तर आज राज्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. त्यांनी तेव्हा जे काही केलं, त्यातून काय मिळवलं?”

त्यांनी पुढे म्हटलं की, सत्तेचा अतिउत्साह न करता घेतलेला वसा कायम ठेवावा, हीच खरी राजकारणातील शिकवण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!