मुकुट यात्रा महोत्सवात मंत्र्यांची उपस्थिती; मंदिरासाठी आर्थिक सहकार्याची ग्वाही

वेल्हाळा गावातील श्रध्दास्थान असलेल्या श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात पारंपरिक व भक्तिभावाने मुकुट यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्याला गावातील नागरिकांसह हजारो भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या महोत्सवात जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटील व वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय भाऊ सावकारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मंदिराच्या विकासासाठी पूर्ण आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही दिली, तसेच येत्या काळात मंदिराचे सौंदर्यीकरण व सुविधा वृद्धी यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे स्पष्ट केले.
महोत्सवाची सुरुवात धार्मिक विधी व मुकुट पूजनाने करण्यात आली. त्यानंतर गावातून भव्य मुकुट यात्रा मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये संपूर्ण गावकऱ्यांसह आजूबाजूच्या गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशा, लेझीम, टाळ-मृदंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.
विशेष आकर्षण ठरले ते महामंडलेश्वर श्री पंढरीनाथ महाराज यांचे आगमन. त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सत्कार व समारोप सोहळ्यात, गावकऱ्यांनी एकमुखाने मंदिराच्या कामासाठी केलेल्या योगदानाची प्रशंसा केली.
या सोहळ्यानिमित्ताने उपवासाचे फराळाचे खास आयोजन करण्यात आले होते, जेथे सर्व भाविकांना प्रसाद रूपात भोजन देण्यात आले. स्त्री-पुरुष, लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच या उत्सवाचा आनंद घेतला.
या मुकुट यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, मंदिर समिती, तरुण मंडळे, महिला मंडळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या महोत्सवाने गावात भक्तिभाव, एकोप्याची भावना आणि सांस्कृतिक वारशाचे जतन याला पुन्हा एकदा अधोरेखित केले.