शाळेचं कुलूप तोडण्याचा इशारा, मुख्याध्यापकांची आत्महत्येची धमकी!

नशिराबाद (ता. जळगाव) – जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले देण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक के. एस. टी. उर्दू शाळा, नशिराबाद येथे गेले असता, माजी मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्षाने अडथळा निर्माण केला. अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी देत धक्कादायक वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे.
दि. २६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उप शिक्षण अधिकारी सौ. रागीणी किशोरराव चव्हाण, प्रशासकीय अधिकारी खलील शेख व अन्य अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांचे दाखले वाटप करण्याच्या उद्देशाने ही भेट होती. मात्र, तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख यांनी दाखलेविषयक नकार दिला. यावेळी त्यांनी शाळेचे रजिस्टर अन्य व्यक्ती घेऊन गेले असल्याचे सांगितले आणि अधिकारी वर्गास सहकार्य करण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर २७ जून रोजी दुपारी २ वाजता पुन्हा अधिकारी शाळेत गेले असता, शाळेला कुलूप लावलेले आढळले. अधिकाऱ्यांनी माजी मुख्याध्यापक वसीम शेख यांना संपर्क साधून चाव्या आणण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला. पंचासमक्ष कुलूप तोडण्याचा इशारा दिल्यानंतर काही वेळात वसीम शेख व शालेय समिती अध्यक्ष शकील शेख घटनास्थळी पोहोचले आणि अधिकार्यांना धमकावले.
“दाखले वाटपाचा अधिकार कोणी दिला? कुलूपाला हात कसा लावला?” अशी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला. इतकेच नव्हे तर, “तुम्ही एकतर्फी चार्ज घेतलात तर आम्ही आत्महत्या करू आणि तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू,“ अशी थेट धमकी दिली गेली. या प्रकारामुळे अधिकारी घाबरले आणि शाळेतून माघारी फिरले.घटनेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फोनवर देण्यात आली. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे शाळेच्या व्यवस्थापनातील अडथळे, विद्यार्थ्यांचे भवितव्य, आणि शासकीय अधिकार्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.