एकनाथ खडसे विरुद्ध भाजप आमदार – सीडी-ईडी प्रकरणाचा मोठा गौप्यस्फोट, राजकारण तापलं!

जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी, २५ जुलै रोजी जळगावमध्ये भाजप आमदारांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या वैयक्तिक चारित्र्यावरही संशय उपस्थित करत ठामपणे गंभीर आरोप लावले.
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दावा केला होता की,
“एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. त्या महिला रात्रभर त्यांच्या घरी राहत असत, सकाळी लोक त्यांना सोडायला जायचे, हे सगळं अनेक लोकांनी पाहिलं आहे,”
असा थेट आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज २६ जुलै २०२५ रोजी एकनाथ खडसे यांनीही पत्रकार परिषद घेत भाजपवर आणि गिरीश महाजनांवर थेट हल्लाबोल केला आहे.
एकनाथ खडसे यांचे प्रत्युत्तर – मोठे आरोप, सीडी-ईडी प्रकरणात गौप्यस्फोट!
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजप आमदारांवर आणि विशेषतः गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की,
“मी अनेकदा म्हटलं होतं की, तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावणार. ही सीडी मला प्रफुल लोढा देणार होते. मात्र त्यांनी ती सीडी मला दिली नाही, म्हणूनच मी सीडी लावली नाही आणि त्यामुळे नाथाभाऊ बदनाम झाला.”
हा गौप्यस्फोट करत त्यांनी स्पष्ट केलं की, गिरीश महाजन आणि त्यांच्या गटाकडूनच त्यांच्यावर ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
खडसे यांचे आरोप:
-
प्रफुल लोढा याने मला सीडी द्यायचं आश्वासन दिलं होतं, पण ती दिली नाही. गिरीश महाजन यांनीच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून ईडीचा गैरवापर केला माझ्या जावयाला देखील अडकवून जेलमध्ये टाकण्यात आले.गिरीश महाजन यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे.प्रफुल लोढाची नार्को टेस्ट व्हावी.
खडसे यांचे चव्हाणांना आव्हान
“मंगेश चव्हाण यांनी माझ्या चारित्र्यावर आरोप केला. मी १९८० पासून ४५ वर्षे राजकारणात आहे. मी १२ खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो, तर गिरीश महाजन अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत. जर माझ्याविरुद्ध तुमच्याकडे एकही छोटासा पुरावा असेल, तर तो समाजासमोर सादर करा, नाहीतर गप्प बसा. पुरावा दिलात तर मी सक्रिय राजकारणातून सन्यास घेईन,”
असं थेट आव्हान खडसे यांनी चव्हाण यांना दिलं.
भाजप आमदारांवर उपरोधिक टोला:
“ही पत्रकार परिषद जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारख्या गंभीर प्रश्नांवर घेतली गेली असती, तर मला आनंद झाला असता. पण ही पत्रकार परिषद केवळ मला टार्गेट करण्यासाठी घेतली गेली. जे आमदार आज आहेत, त्यांना मीच घडवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही. त्यांची मजबुरी मला समजते,”
असं उपरोधाने सांगत खडसे यांनी भाजपमधील अंतर्गत संघर्षाचे संकेत दिले.
सत्ताधाऱ्यांवर देखील सवाल:
“सध्या सरकारमध्ये अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ईडीसारखे आरोप आहेत, पण ते आता कसे पवित्र झाले?”
असा थेट सवाल करत खडसे यांनी सत्तेतील दोन वजनदार मंत्र्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
शेवटचं विधान – वाघाचं उदाहरण:
खडसे यांनी त्यांच्या भाषणाचा शेवटही एक रोखठोक विधान करत केला:
“एका वाघापुढे लांडग्यांची फौज उभी केली तरी वाघ, वाघच असतो. गिरीश महाजन म्हणाले होते की विषय संपला, पण जोपर्यंत प्रफुल लोढा जेलमध्ये आहे, तोपर्यंत हा विषय संपणार नाही.”
या पत्रकार परिषदांमधून खडसे विरुद्ध भाजप हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सीडी-ईडी प्रकरणातून खडसे यांनी केलेला गौप्यस्फोट आणि भाजप आमदारांनी लावलेले वैयक्तिक आरोप हे राज्याच्या राजकारणात एक नवा वळण आणू शकतात. जळगावमध्ये सुरू झालेला हा वाद आता केवळ जिल्हा पातळीपुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकीय रंगमंचावर मोठ्या संघर्षाचे रूप घेईल, अशी चिन्हे आहेत.