पाऊस थांबणार? पुन्हा मुसळधार पावसाची तयारी करा

मुंबई | प्रतिनिधी:
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाला लवकरच ब्रेक मिळणार असून 15 जुलैपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र 20 जुलैनंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता निवळले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असल्यामुळे विदर्भात सध्या काहीसा ब्रेक मिळाला आहे.
विदर्भात पावसाने विश्रांती; पूरस्थिती सुधारतेय
गेल्या चार-पाच दिवसांपासून विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती हळूहळू सुधारतेय. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत पूर ओसरू लागला आहे. चंद्रपूरमध्ये पावसामुळे 55 घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसांनी पाऊस थांबल्यामुळे 21 बंद झालेले मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीच्या पुराचा जोर कमी झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस विदर्भात हलकासा पाऊस
11 ते 14 जुलै दरम्यान विदर्भातील काही भागांत हलकासा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून भंडारा, गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
15 जुलैनंतर पावसाचा जोर कमी
15 जुलैपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे पूरग्रस्त भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येईल. मात्र 20 जुलैनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतीसाठी दिलासादायक पाऊस
जून महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात पावसाची तूट होती, मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ही तूट भरून निघाली आहे. या पावसामुळे शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी मिळाले असून खरीप हंगामासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी नद्या शंभर टक्के भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या पुढील सूचना लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.