बातम्या

लोणवाडी : ग्रामपंचायतीत खाडाखोड; पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्याचे नाव वगळल्याने खळबळ

लोणवाडी हादरलं! घरकुल यादीत खाडाखोड, भ्रष्टाचार उघड

लोणवाडी, ता. जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील लोणवाडी गावातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे नाव वगळल्याप्रकरणी मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतच्या सरकारी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून पात्र लाभार्थ्याला वंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या अन्यायाविरोधात लाभार्थ्याच्या मुलाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.


सविस्तर माहिती

लोणवाडी गावातील कमलाबाई शिवाजी चव्हाण (बेलदार) यांचे नाव पंतप्रधान आवास योजनेच्या ऑफलाईन यादीत ‘ड’ यादीत अनुक्रमांक 41 वर होते. मात्र, ऑनलाईन यादीत त्यांचे नाव अचानक गायब झाल्याचे समोर आले. या संदर्भात लाभार्थी कुटुंबाने ग्रामसेवकांकडे चौकशी केली असता, संतोषजनक उत्तर न मिळाल्याने जाणीवपूर्वक नाव वगळल्याचा संशय लाभार्थी कुटुंबावर बळावला.


माहिती अधिकारातून उघडकीस आलेला प्रकार

लाभार्थी कमलाबाई चव्हाण यांचे पुत्र अॅड. अरुण शिवाजी चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आणि माहितीचा अधिकार (RTI) कायदा 2005 अंतर्गत माहिती मागवली. संबंधित दस्तऐवज मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीतील ठरावामध्ये खाडाखोड झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यातील ठराव क्र. 8/1 मध्ये ३० नावे घरकुल यादीतून वगळल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. मात्र, अनुक्रमांक 31 आणि 32 वर लहान अक्षरात दोन नवीन नावे वाढवण्यात आली, तर एकूण वगळलेल्या नावांची संख्या मात्र ३० अशीच दाखवण्यात आली आहे. या संशयास्पद बदलामुळे पात्र लाभार्थ्याचे नाव यादीतून गायब झाल्याचा गंभीर आरोप अरुण चव्हाण यांनी केला आहे.


सरकारी कागदपत्रांमध्ये खाडाखोड

अॅड. चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग बुकमध्ये फेरफार करून काही नावे जाणीवपूर्वक वगळली व काही नावे नंतर टाकली गेल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गावात पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पात्र लाभार्थ्यांचे नाव वगळून अन्याय करण्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, ग्रामसेवक, सरपंच आणि सरपंच पती यांच्याविरोधात गावकऱ्यांमध्ये अविश्वास आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.


ग्रामसेवकावर संशयाची सुई

या संपूर्ण प्रकरणात ग्रामसेवकाची भूमिका सर्वाधिक संशयास्पद मानली जात आहे. प्रोसिडिंग बुकसह सर्व कागदपत्रांवर ग्रामसेवकाची सही असताना, ठरावातील खाडाखोडीबद्दल त्याने डोळेझाक केली का किंवा संगनमत केले हा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील नागरिकांनी या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


घरकुलासाठी पैशांची मागणी

लाभार्थी कमलाबाई चव्हाण या सन 2005 पासून लोणवाडीच्या शासकीय जागेत वास्तव्यास आहेत. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. ऑफलाईन यादीत नाव क्रमांक 41 वर असल्याने त्या पात्र होत्या. मात्र, त्यांना घरकुल मंजुरीसाठी पैसे द्यावे लागतील, अन्यथा घरकुल मिळणार नाही अशी धमकी ग्रामसेवक व सरपंचांकडून दिली गेल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


कारवाईची मागणी

पावसाळ्याचे दिवस सुरू असताना लाभार्थीचे मातीचे घर धोक्यात आहे. सरकारी योजनेतील भ्रष्टाचार, अन्याय आणि गैरव्यवहार उघड झाल्याने गावकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. अॅड. अरुण चव्हाण यांनी ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण, सरपंच अनिता बळीराम धाडी आणि सरपंच पती बळीराम तुकाराम धाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे.


पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार, ठरावामध्ये केलेल्या खाडाखोडीमुळे गावातील विकास कामांवरील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकरणाची तात्काळ चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व तक्रारदार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!