नवरात्री व आगामी सण-उत्सव पार पाडण्यासाठी जळगाव पोलिसांचा रूट मार्च

जळगाव :जळगाव शहरात नवरात्री तसेच आगामी दसरा, दिवाळी यांसारखे प्रमुख सण शांततेत, आनंदात आणि सुरक्षेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जळगाव शहर पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मा. नितीन गणापुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यामध्ये एमआयडीसी, शनीपेठ, शहर पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक सुद्धा उपस्थित होते. रूट मार्चमध्ये शहरातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मार्गक्रमणादरम्यान पोलिसांनी मुख्य बाजारपेठा, वर्दळीचे रस्ते, तसेच धार्मिक व संवेदनशील परिसरातून पायी संचलन केले. यावेळी नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच अवांछित घटना टाळणे हा मुख्य उद्देश होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणापुरे यांनी सांगितले की, “सण-उत्सव हा आनंदाचा सोहळा आहे. मात्र त्यावेळी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. रूट मार्चद्वारे याच संदेशाचा प्रसार करण्यात आला आहे.”
रूट मार्चदरम्यान शहरातील नागरिकांनी पोलिसांचे स्वागत केले. अनेकांनी पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. यावेळी पोलीस अधिकारी व जवानांबरोबर होमगार्ड तसेच ट्रॅफिक शाखेचेही पथक सहभागी झाले होते.
सण-उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाने सुरक्षा नियोजन आखले असून, बाजारपेठा, देवी मंडळे, प्रमुख रस्ते व चौकांवर पोलीस तैनात राहणार असल्याची माहिती देण्यात आली.