LCB जळगावची गुप्त माहितीवर कारवाई – पिस्टलसह युवक गजाआड
जळगाव शहरातील आंबेडकर मार्केट परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, देशी पिस्टल व ५ जिवंत काडतुसेसह तरुण अटक.

जळगाव श्री मराठी न्यूज । ८ ऑगस्ट २०२५ ।
जळगाव, दि. ५ ऑगस्ट – स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून देशी बनावटीचे पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. ही कारवाई मंगळवारी जळगाव शहरातील आंबेडकर मार्केट परिसरात करण्यात आली.
घटनेचा तपशील असा की, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील अक्षय अजय जयस्वाल (वय-२४, रा. शिवाजी नगर) याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असल्याचे उघड झाले. या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.पथकाने तात्काळ कारवाई करत जयस्वाल याचा शोध घेऊन त्याला आंबेडकर मार्केट परिसरातून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती दरम्यान त्याच्या मोटारसायकल (क्र. MH 19 BK 8893) च्या सीटखाली लपवलेले एक देशी बनावटीचे पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्राची अंदाजे किंमत सुमारे ₹४०,०००/- इतकी आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोउपनि. शरद बागल यांच्यासह पो.हे.का. अकरम शेख, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, नितीन बाविस्कर, पो.ना. किशोर सोनवणे, सिध्देश्वर डापकर, रविंद्र कापडणे, गोपाल पाटील यांचा समावेश होता.