कपिलेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार वेगात – अफवेखोरांना ट्रस्टचा कायदेशीर इशारा!

जळगाव/वेल्हाळे (ता. भुसावळ) ( प्रतिनिधी प्रवीण पाटील)– वेल्हाळे येथील प्रसिद्ध कपिलेश्वर महादेव मंदिर देवस्थानाच्या जीर्णोद्धाराच्या शुभारंभानंतर मंदिर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. मंदिर विकास, सेवा कार्य आणि धार्मिक उपक्रम पारदर्शकतेने, सर्व भक्तांच्या सहकार्याने सुरू असून, यासाठी ट्रस्टच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
२८ जुलै रोजी भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिसरातील तसेच बाहेरील गावातील भाविकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दररोज दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत असून, देणग्यांचा आणि मदतीचा ओघही वाढत आहे.
मात्र, या प्रगतीकडे पाहून काही व्यक्ती द्वेषभावनेतून अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे की, मंदिराचा जमा-खर्च पारदर्शक पद्धतीने केला जातो आणि सर्व निर्णय भाविकांना विश्वासात घेऊनच घेतले जातात. मंदिराच्या व्यवस्थापनात कोणतेही गैरप्रकार झालेले नाहीत, तसेच ट्रस्टमध्ये पंढरीनाथ महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून कोणीही दावा करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अकाउंट सील प्रकरणावरून वाद
गावातील काही व्यक्तींनी ट्रस्टी अध्यक्ष पंढरीनाथ महाराज यांच्याजवळ चुकीचा संदेहनिर्माण केल्याचा आरोप ट्रस्ट सदस्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराजांनी काही चुकीच्या लोकांचे ऐकून कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे बँक खाते सील केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भाविकांना देणगी देताना अडचणी निर्माण होत आहेत.
सदस्यांच्या म्हणण्यानुसार, महाराजांनी मंदिराच्या खात्यातील रक्कम आपल्या हाती द्यावी आणि त्यातील काही निधी मुक्ताईनगर येथे वापरावा, अशी मागणी केली. मात्र, ट्रस्टचे उपाध्यक्ष, सचिव, सदस्य आणि १५ कार्यकारिणी ट्रस्टी यांना हा प्रस्ताव मान्य नसून, “मंदिरासाठी आलेला प्रत्येक रुपया फक्त आणि फक्त कपिलेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीच वापरला जाईल,” या भूमिकेवर ते ठाम आहेत.
भाविकांना आवाहन
ट्रस्ट सदस्यांनी पंढरीनाथ महाराजांना नम्र विनंती केली आहे की, मंदिराच्या पवित्र कार्यात कोणताही हस्तक्षेप करू नये. तसेच, ज्यांना मंदिराच्या व्यवहारांबाबत काही शंका असतील, त्यांनी खुलेपणाने ट्रस्ट व १५ कार्यकारिणी सदस्यांसमोर विचारणा करावी, त्यांना सक्षम व ठोस उत्तर देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
देवस्थान ट्रस्टने भाविकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि मंदिराच्या विकास व जीर्णोद्धारासाठी एकदिलाने सहकार्य करावे.