छगन भुजबळ यांच्या निधनाची बनावट बातमी सोशल मीडियावर व्हायरल; सायबर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक | ३० जून २०२५
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या निधनाची बनावट बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बनावट बातमीसाठी एका नामांकित दूरचित्रवाणी वाहिनीचा बनावट लोगो वापरण्यात आला होता, आणि ही खोटी माहिती यूट्यूबवरून प्रसारित करण्यात आली होती.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, २८ जूनच्या रात्री एका अज्ञात व्यक्तीने ‘मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन’ अशी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली. या व्हिडिओमध्ये एका प्रसिद्ध दूरदर्शन वाहिनीचा लोगो वापरून बनावट थंबनेल तयार करण्यात आली होती, जेणेकरून लोकांना ही बातमी खरी वाटावी.
यामागचं सत्य काय?
या बनावट बातमीमध्ये छगन भुजबळ यांच्या निधनाची माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात, छगन भुजबळ यांनी यूट्यूबवरून रंजनीताई बोरस्ते यांच्या निधनावर श्रद्धांजलीपर पोस्ट केली होती. याच पोस्टचा अर्थ चुकीच्या पद्धतीने मांडून, मंत्री भुजबळ यांच्या निधनाची खोटी क्लिप सोशल मीडियावर टाकण्यात आली होती.
पोलिसांची कारवाई
ही बाब विशेष शाखेचे अधिकारी सुनील बहारवाल यांच्या लक्षात आली. ते सोशल मीडियावर सातत्याने आक्षेपार्ह कंटेंटवर नजर ठेवतात. त्यांनी तातडीने संबंधित व्हिडिओची लिंक तपासली आणि नाशिक सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असून @Nana127tv नावाच्या यूट्यूब चॅनलवरून ही माहिती पसरवण्यात आली होती. या चॅनलचं डिस्प्ले नाव ‘हेल्पलाइन किसान’ असं आहे. सध्या या यूट्यूब चॅनलविरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सव्वा लाखांहून अधिक नागरिकांनी ही खोटी पोस्ट पाहिली असून त्यामुळे समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
पुढील तपास
पोलिस आता या चॅनलच्या मालकाचा व यामागील खऱ्या सूत्रधाराचा शोध घेत आहेत. ही माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
सूचना: समाजात शांतता व समतेचा संदेश देणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. अशा प्रकारच्या अफवा वा खोट्या बातम्या पसरवणं हा गंभीर गुन्हा असून, यासाठी आयटी कायद्यानुसार कडक शिक्षा होऊ शकते. नागरिकांनी अशा पोस्ट्सची सत्यता तपासूनच त्यावर विश्वास ठेवावा आणि खोटी माहिती लगेच संबंधित पोलिस अथवा अधिकाऱ्यांना कळवावी.