एकनाथ शिंदे पक्षप्रमुख होणार?; शिवसेना शिंदे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत ठरावांचा पाऊस

मुंबई | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना (शिंदे गट) ची कार्यकारणी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत पक्षाच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. विशेषतः ‘पक्षप्रमुख’ पदावर एकनाथ शिंदे यांना बसवण्याच्या मुद्द्यावर पक्षात चांगलीच चर्चा रंगली. अनेक पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली असून अंतिम निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बैठकीतील ठराव आणि निर्णय:
या बैठकीत विविध विषयांवर ठराव मंजूर करण्यात आले. त्यात खासदार श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन, केंद्र सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाचे स्वागत, मराठी अस्मितेसंदर्भात विशेष ठराव, विदेशात भारताची बाजू भक्कमपणे मांडण्याचा संकल्प, तसेच पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचा निर्णय यांचा समावेश होता.
त्याचबरोबर पक्षाच्या पदनावामध्ये बदल करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. पुढील अधिवेशन दिल्लीत घेण्यासंदर्भातही चर्चा झाली. ‘शिवसेना पक्षप्रमुख’ किंवा ‘राष्ट्रीयप्रमुख’ अशा दोन्ही पदनामांबाबत चर्चा झाली असून यावर पक्षात मतविभाजन दिसून आले.
शिंदे यांची भूमिका स्पष्ट
यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मला कोणतं पद द्यायचं यावर पदाधिकाऱ्यांचं एकमत झालेलं नाही. त्यामुळे तोपर्यंत माझं ‘मुख्य नेता’ हेच पद कायम राहील. पदं येतात आणि जातात, पण नाव टिकवणं महत्त्वाचं आहे आणि मी ते जपतोय. कार्यकर्ता आणि लाडका भाऊ हेच माझं खरं पद आहे.”
मंत्र्यांना कानपिचक्या
या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना आणि आमदारांना थेट कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, “कमी बोला आणि जास्त काम करा. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः अडचणीत येऊ नका. एक चुकीचा शब्द पक्षाला संकटात टाकू शकतो. आपण मिळवलेलं यश चुकीच्या वक्तव्यांमुळे गमावू नका.”
ते पुढे म्हणाले, “आपण जे काम करतो त्याची ब्रेकिंग न्यूज व्हायला पाहिजे. शिस्त भंग करणाऱ्या कोणत्याही गोष्टी टाळा.”
मराठी अस्मिता आणि विकासावर भर
शिंदे यांनी मराठी अस्मितेवर आपली भूमिका ठामपणे मांडली. “मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करावं लागेल ते करू. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या सरकारच्या कार्यकाळात मिळाला. मराठी भाषा भवन उभं करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. मुंबई सोडून गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” असे त्यांनी सांगितले.