शिवतीर्थ मैदानावर पहिल्यांदाच ‘डोम गरबा’चा थाट – लाखोंच्या खर्चातून तरुणाईसाठी खास पर्वणी
२०० फूट गॅलरीतून ८ हजार प्रेक्षक पाहणार रंगतदार सोहळा

जळगावकरांनो, यंदाची नवरात्र महोत्सवी रात्र खास ठरणार आहे. कारण २२ सप्टेंबरपासून शिवतीर्थ मैदानावर ‘जीएम फाउंडेशन’ आणि ‘पेशवा ढोल पथक’ यांच्या पुढाकारातून शहरात पहिल्यांदाच भव्य **‘डोम गरबा’**चे आयोजन केले जात आहे. तब्बल ६० लाखांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या कार्यक्रमाची मोठ्या थाटात तयारी सुरू असून, जळगावची तरुणाई यंदा अनोख्या वातावरणात थिरकणार आहे.
वॉटखूफ डोममध्ये एकाचवेळी २ हजारांहून अधिक जणांसाठी व्यवस्था
नगरहून आणलेल्या आधुनिक डोममध्ये एकावेळी २ हजारांहून अधिक तरुण-तरुणींना गरब्याचा आनंद घेता येणार आहे. आकर्षक लेझर शो, रंगीत लायटिंग यामुळे संपूर्ण डोम उत्साहाने उजळून निघणार आहे.
मुंबईच्या ऑर्केस्ट्राचा थरारक अनुभव
या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतून येणारा लाइव्ह ऑर्केस्ट्रा. प्रसिद्ध गायक भाग्यश्री शिवदे, रक्षंदा बोबडे, प्रशांत मिस्तरी यांच्यासह १४ कलाकारांची टीम गुजराती, हिंदी आणि मराठी गाण्यांच्या रिमिक्सवर प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडणार आहे.
प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरी
डोमच्या बाहेर २०० फूट लांबीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. येथे तब्बल ८ ते १० हजार प्रेक्षक बसून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकणार आहेत.
पास आणि बुकिंगची माहिती
या डोम गरब्यात सहभागी होण्यासाठी ११०० रुपयांचा पास ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत ८०० हून अधिक गरबाप्रेमींनी पासचे बुकिंग केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
रोज आकर्षक बक्षिसांची मेजवानी
प्रत्येक रात्री सहभागींसाठी दुचाकी, फर्निचर, पैठणी साडी अशा आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना
कार्यक्रमाच्या दरम्यान महिलांच्या सुरक्षेसाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या आयोजनामागील परिश्रम
या संपूर्ण डोम गरबा सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नरेश सोनवणे, श्याम मराठे, भावेश वारुळे, सनी वाणी, निखिल वाणी, देवा सपकाळे, हर्षल भालेराव, दीपक साळुंखे आदी आयोजकांच्या टीमने मोठे परिश्रम घेतले आहेत.