
लोणवाडी, ता. जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी अर्ज करून ऑफलाईन यादीत नाव असतानाही ऑनलाईन यादीतून नाव गायब केल्याचा धक्कादायक प्रकार लोणवाडी गावात उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे गरजू लाभार्थ्याला घरकुलापासून वंचित ठेवण्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीवर करण्यात येत असून, यामुळे संपूर्ण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता दरमहा ₹12,000 पेन्शन मिळणार!
लोणवाडी येथील रहिवासी कमलाबाई शिवाजी चव्हाण (बेलदार) यांचे नाव पंतप्रधान आवास योजनेच्या ऑफलाईन लाभार्थी यादीत ‘ड’ गटात ४१ क्रमांकावर स्पष्टपणे नमूद होते. मात्र, ऑनलाईन पोर्टलवर हे नाव सापडत नसल्याचे दिसून आले. याबाबत माहिती घेतली असता, ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण यांनी “तपासून सांगतो” असे सांगून वेळ मारून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीकडे दुर्लक्ष, ग्रामसेवकांचा टाळाटाळीचा पवित्रा
या संदर्भात लाभार्थ्यांच्या मुलाने गटविकास अधिकारी, जळगाव यांच्याकडे ई-मेल द्वारे लेखी तक्रार केली असून, ग्रामसेवकाकडे तोंडी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामसेवकांकडून सातत्याने वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
“घरकुलासाठी पात्र असूनही केवळ ऑनलाईन यादीत नाव नसल्यामुळे माझ्या आईला योजना लाभ मिळत नाही, हा प्रकार दु:खद आणि अन्यायकारक आहे. प्रशासनाने याची चौकशी करून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा,” अशी मागणी अरुण चव्हाण यांनी केली आहे.
प्रशासनाकडून तातडीने चौकशीची गरज
या प्रकरणी ग्रामसेवकांशी संपर्क साधून माहिती घेतली असता, त्यांनी कोणताही स्पष्ट खुलासा न करता “तपासून सांगतो” असे उत्तर दिले. त्यामुळे प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलेल्या लाभार्थ्यांना न्याय देण्याची गरज व्यक्त होत आहे.
महत्वाचे मुद्दे –
- पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी कमलाबाई चव्हाण यांचे नाव ऑनलाईन यादीतून गायब
- ग्रामसेवकाकडून वेळकाढूपणा व दुर्लक्ष
- गटविकास अधिकाऱ्यांकडे ई-मेल द्वारे लेखी तक्रार दाखल
- घरकुल लाभापासून वंचित राहण्याचा धोका
- संपूर्ण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी, माहिती अपडेशनमधील हलगर्जीपणा व ग्रामस्तरावर होणाऱ्या मनमानीवर प्रकाश पडतो. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.