जळगाव पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’ – गावठी कट्टा विक्रेते अटकेत!

जळगाव – जळगाव जिल्ह्यात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मिश्र वस्तीच्या भागात व इतर संवेदनशील ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून, काही समाजकंटकांकडून अवैधरित्या शस्त्र बाळगून गुन्हे घडू नयेत यासाठी वेळोवेळी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले जात होते. याच पार्श्वभूमीवर मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव व मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
दि. ८ जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ. रवी नरवाडे व पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील दोन इसम गावठी कट्टे विक्रीच्या उद्देशाने महाराष्ट्रात येत असून ते पाल, ता. रावेर मार्गे जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रवी नरवाडे यांनी तत्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविली.
यास प्रतिसाद देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.निरीक्षक शरद बागल, स.फौ. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.कॉ. बबन पाटील आणि चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी यांच्या पथकाची तात्काळ स्थापना करून कारवाईच्या सूचना दिल्या.
सिनेस्टाईल सापळा आणि पाठलाग
पथकाने रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुर्गम भागातील जंगल परिसरात सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास अंदाजे ४५ वर्षीय इसम, ज्याने निळी पगडी घातलेली होती, तो TVS Raider (क्र. MP-10-ZC-9650) मोटरसायकलवरून, व त्याच्या पाठोपाठ २५ वर्षीय इसम TVS Sport (क्र. MP-10-MV-1462) मोटरसायकलवरून येताना दिसून आले.
सदर पथकातील पोलीस अंमलदारांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकातील अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आणि दुसऱ्या बाजूस सापळा लावून, शिताफीने दोघा आरोपींना ताब्यात घेतले.
संपूर्ण मुद्देमाल जप्त, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अंगझडती दरम्यान दोघांकडून ०२ गावठी कट्टे, ०२ मोटरसायकली, ०२ मोबाईल हँडसेट असा एकूण अंदाजे ₹१,७०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेले आरोपी खालीलप्रमाणे आहेत:
1. गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय-४५), रा. सिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन (म.प्र.)
2. निसानसिंग जिवनसिंग बरनाला (वय-२३), रा. उमटी, ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. सिरवेल महादेव, ता. भगवानपुरा (म.प्र.)
या दोघांना रावेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गु.र.नं. २५४/२०२५ प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.उप.निरीक्षक तुषार पाटील, रावेर पोलीस स्टेशन हे करत आहेत.
पोलीसांकडून जनतेला आवाहन
जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोठेही अवैध गावठी शस्त्र बाळगणारे किंवा विक्रीस आणणारे इसम दिसल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती द्यावी. आपले नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
तपास करणाऱ्या पथकाचे विशेष कौतुक
या संपूर्ण कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पो.उप.निरीक्षक शरद बागल, स.फौ. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.कॉ. बबन पाटील, चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी यांनी उत्तम सहकार्य करून यशस्वी कारवाई पार पाडली.
जळगाव पोलिसांची ही धडक कारवाई जिल्ह्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.