30 लाखांची हस्तगत रक्कम मयताच्या नातेवाईकांना परत – पोलिसांचे यशस्वी तपासकार्य

जळगाव, दि. 23 जून 2025: जळगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक 312/2024 या गंभीर गुन्ह्यात मयत स्नेहलता अनंत चुंबळे यांच्या हत्येनंतर आरोपींकडून लालसेपोटी हस्तगत केलेली 30 लाख रुपये रोख रक्कम अखेर मयताच्या नातेवाईकांना परत देण्यात आली आहे.
हा गुन्हा दिनांक 02/09/2024 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 61(2), 238, 3(5) अंतर्गत दाखल झाला होता. यामध्ये आरोपी क्र. 1 जिजाबराव अभिमन्यु पाटील (रा. अमळनेर) व आरोपी क्र. 2 विजय रंगराव निकम (रा. अमळनेर) यांनी संगनमत करून मयत स्नेहलता अनंत चुंबळे हिची हत्या करून तिच्याकडील 30 लाख रुपये रक्कम मिळवण्याच्या हेतूने कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गुन्ह्याचा तपास करताना जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे तपास अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडी मिळवली. कोठडी दरम्यान आरोपींकडून सदरची 30 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती, जी पोलिसांनी जप्त करून सुरक्षित ठेवली होती.
यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव येथील मा. मा. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आदेश क्रमांक मजाक्र.220/2025 दिनांक 19/06/2025 अन्वये मयत स्नेहलता यांचे नातेवाईक व फिर्यादी समीर उर्फ सौरभ संजय देखमुख व संजय नानासाहेब देखमुख यांच्याकडे ही रक्कम परत देण्याचे आदेश दिले.
त्यानुसार दिनांक 23/06/2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सदर 30 लाख रुपये रक्कम मयताच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावित, तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखनिक हवालदार प्रविणा जाधव, पोलीस नाईक प्रविण पाटील व पोलीस कर्मचारी गणेश पाटील यांनी केली.
पोलिसांच्या कार्यक्षम आणि पारदर्शक तपासामुळे आरोपींना अटक करून, मयताच्या नातेवाईकांना त्यांच्या पैशांची योग्य ती परतफेड मिळाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.