तलवार व कोयता बाळगून दहशत माजविणाऱ्या केले जेरबंद

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील मिश्र वस्तीच्या ठिकाणी तसेच इतर संवेदनशील भागांत सण-उत्सवाच्या काळात काही समाजकंटकांकडून शस्त्र बाळगून दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस विभागाकडून वेळोवेळी शस्त्रसंबंधी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव व मा. अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक 09/07/2025 रोजी पो.ना. श्रीकृष्ण देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम बोदवड ते शेलवड तसेच महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्याने बोदवड, ता. बोदवड, जि. जळगाव येथे हातात तलवार व कोयता घेऊन दहशत माजवित आहे.
सदर माहिती पो.ना. श्रीकृष्ण देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांना कळविल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पो. उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ. प्रितम पाटील व पो. अं. रविंद्र चौधरी यांच्या पथकाची स्थापना करून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार, पथकातील अधिकारी व अंमलदारांनी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत बोदवड ते शेलवड तसेच महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्याने शोधमोहीम राबविली. त्यावेळी इसम नामे पुरुषोत्तम श्रावण वंजारी, वय 26 वर्षे, रा. माळी वाडा, बोदवड, ता. बोदवड हा आपल्या ताब्यात तलवार व कोयता ठेवून परिसरात दहशत माजवीत असताना आढळून आला.
त्याच्या ताब्यातील सदर तलवार व कोयता, एकूण किंमत अंदाजे रु. 4,500/- चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 106/2025 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम 4/25 तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.