जळगाव गुन्हे शाखेचा ‘स्ट्राईक ऑपरेशन’! दोन गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त
वरणगावमध्ये दहशत माजवणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

जळगाव (प्रतिनिधी) –जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेने एक धडक कारवाई करत वरणगाव शहरातून विना परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ₹५०,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही
🌙 घटनाक्रम
दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी मा. पोलिस अधीक्षक श्री. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आगामी सण-उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, वरणगाव येथील रेकॉर्डवरील आरोपी संजय गोपाळ चंडेले (वय ५०, रा. दर्यापूर शिवार, ऑर्डनेंस फॅक्टरी वरणगाव) हा विना परवाना शस्त्र बाळगून फिरत आहे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वरणगाव शहरातील तिरंगा चौकात रात्री सुमारास ११.३० वा. येणार असल्याची खात्री झाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.
🚔 कारवाईचा तपशील
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.निरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथक तिरंगा चौकात पोहोचले. तेथे झाडाजवळ उभ्या संशयित व्यक्तीला पकडण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव संजय गोपाळ चंडेले (वय ५०) असे सांगितले.
अंगझडतीत त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून आला. शस्त्रांची एकूण किंमत ₹५०,५००/- एवढी आहे.
⚖️ गुन्हा नोंद व तपास
या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २१३/२०२५ अंतर्गत आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सुभाष सपकाळ करीत आहेत.
दरम्यान, आरोपी संजय चंडेले याच्यावर यापूर्वी देखील खालीलप्रमाणे आर्म्स अॅक्टचे दोन गुन्हे नोंद आहेत:
१️⃣ गु.र.क्र. ०२/२०२२, कलम ३/२५, आर्म्स अॅक्ट (वरणगाव पो.स्टे.)
२️⃣ गु.र.क्र. २८/२०२२, कलम ३/२५, आर्म्स अॅक्ट (वरणगाव पो.स्टे.)
👮♂️ अभियानामागील अधिकारी व पथक
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पो.उ.निरीक्षक शरद बागल, ग्रे.पो.उ.निरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना विकास सातदीवे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ प्रशांत परदेशी, पोकॉ राहुल वानखेडे तसेच चापोकॉ भारत पाटील यांनी सहभाग घेतला.
🗣️ पोलीसांचे आवाहन
पोलीस विभागाने जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींबाबत त्वरित पोलिसांना
कळवावे, जेणेकरून कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील.