लाच घेताना महिला अधिकारी रंगेहाथ पकडली!

जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्यातर्फे करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधिक्षक वर्ग २ पदावर कार्यरत आहेत. दिनांक १४ जुलै २०२५ रोजी ते जिल्हा परिषद कार्यालयात, आपल्या जून २०२५ च्या पगार बिलासंदर्भात संबंधित विभागात गेले असता, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती माधुरी भागवत यांनी कोणतीही त्रुटी नसतानाही पगार बिलावर सही करण्यासाठी १२,००० रुपये लाच मागितली.
तक्रारदाराने लाच न देता थेट २२ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पडताळणी दरम्यान आरोपी महिला अधिकाऱ्याने १०,००० रुपये लाचेची मागणी करत ५,००० रुपये पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात घेण्याचे कबूल केले.
यानुसार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी श्रीमती माधुरी भागवत यांनी ५,००० रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली आणि त्याच क्षणी त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.सदर प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, अधिक तपास सुरु आहे.
ही संपूर्ण कारवाई ला.प्र.वि. जळगाव युनिटचे पोलीस उपअधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. हेमंत नागरे यांनी केली.
सापळा पथकात GPSI सुरेश पाटील, पोहेकाँ शैला धनगर, पोकाँ प्रणेश ठाकूर आणि सचिन चाटे यांचा समावेश होता.
या कारवाईने पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करत, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात असल्याचा संदेश दिला आहे.
> लाच द्या नका – लाच घेऊ नका!
भ्रष्टाचाराविरुद्ध आपली साथ ठेवा!