बातम्या

लाच मागणारा ग्रामसेवक रंगेहात पकडला!

भडगाव तालुक्यातील मांडकी गावातील ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांच्याविरोधात घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्ता व गट नमुना ८ मिळवून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव (ACB) यांनी २३ जून २०२५ रोजी यशस्वी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले.

या प्रकरणातील तक्रारदार हे ३५ वर्षीय पुरुष असून ते मांडकी (ता. भडगाव) येथील रहिवासी आहेत. त्यांनी ACB कडे दिलेल्या तक्रारीनुसार, मंजूर झालेल्या घरकुलाच्या दुसऱ्या हप्ता व गट नंबर नमुना ८ मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. पाचोरा) आणि रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. पाचोरा) यांनी एकत्रितपणे ६०००/- रुपयांची लाच मागितली होती.

या तक्रारीची पडताळणी २३ जून २०२५ रोजी पंचासमक्ष करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपींनी तडजोड करत ५०००/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, याच दिवशी ACB पथकाने सापळा रचून पंचासमक्ष ५०००/- रुपयांची लाच स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडले.

सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर (ला.प्र.वि. जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (नंदुरबार) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव (जळगाव) कार्यरत आहेत.

सापळा कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकात स.पो.उ.नि. दिनेशसिंग पाटील, स.पो.उ.नि. विलास पाटील, पो.नाईक हेमंत पाटील आणि पो.नाईक सुभाष पावरा (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार) यांनी सहभाग घेतला. या संपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (नाशिक परिक्षेत्र) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

आरोपींविरुद्ध कडक कारवाईची प्रक्रिया सुरू असून, भ्रष्टाचाराविरुद्धची ही ठोस कृती नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!