पाळधी–तरसोद बायपास रस्त्याची पाहणी; खोटेनगर–पाळधी रस्त्यासाठी 30 कोटी निधी मंजूर

जळगाव, दि. 6 जुलै :
जळगाव जिल्ह्यातील वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या पाळधी–तरसोद बायपास रस्त्याच्या कामाची आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील 17.70 किलोमीटर लांबीच्या या बायपास रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन महिन्यांत संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारी जड वाहतूक थेट बायपासवर वळवली जाणार असून, शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात मोठा फरक पडणार आहे.
खोटेनगर–पाळधी रस्त्यासाठी 30 कोटी मंजूर
पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. खोटेनगर ते पाळधी या रस्त्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, बायपासचे काम पूर्ण होताच या रस्त्याचे काम सुरू केले जाईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्वाचे बांधकाम अंतिम टप्प्यात
बायपास मार्गावर विविध पायाभूत सुविधांचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये रेल्वे ओव्हरब्रिज, लघुपुल, गिरणा नदीवरील मोठा पूल यांचा समावेश आहे. प्रशासनाकडून या कामांना विशेष प्राधान्य देऊन कामाची गती वाढवली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्राप्त माहितीनुसार, बायपास मार्गातील प्रगती पुढीलप्रमाणे आहे:
-
एकूण 25 नवीन कल्वर्ट्सपैकी 24 पूर्ण झाले असून, उर्वरित एक कल्वर्ट अंतिम टप्प्यात आहे.
-
10 पैकी 9 लघुपुलांचे काम पूर्ण झाले आहे.
-
4 अंडरपासेसचे काम पूर्ण झाले आहे.
-
गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
-
2 रेल्वे ओव्हरब्रिजपैकी एका ओव्हरब्रिजचे काम सुरू असून, दुसऱ्या ओव्हरब्रिजचे काम लवकरच सुरू होणार आहे.
वाहतुकीचा ताण कमी होणार
हा बायपास मार्ग सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी जड वाहतूक थेट शहराबाहेरून वळवली जाणार आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच अपघातांची शक्यता देखील कमी होईल.
पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा.