फलक वाचणारे कोणीच नाही का? पोलीस कार्यालयातच कायद्याचे उल्लंघन

जळगाव – महाराष्ट्र राज्याच्या 100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावल्याची बातमी अत्यंत अभिमानास्पद आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने आपल्या कार्यशैली, नेतृत्व आणि सर्वांगीण समन्वयातून हे यश मिळवले आहे
मात्र, याच कार्यालयाच्या आवारात एक अत्यंत खेदजनक दृश्य नजरेस पडले आहे – “येथे धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे; उल्लंघन केल्यास 200 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल” असा फलक लावलेला असतानाही, नेमकं त्याच्या खालतीच पुड्या खाऊन थुंकलेले दिसते!
ही बाब केवळ कार्यालयाच्या शिस्तीला काळिमा फासणारी नाही, तर जनतेत चुकीचा संदेश देणारी आहे. जे ठिकाण कायद्याचे पालन व्हावे म्हणून उभे आहे, तिथेच कायद्याचे उल्लंघन दिसणे ही शरमेची बाब आहे.
शिस्त ही केवळ यंत्रणांमध्ये नव्हे, तर मानसिकतेतही दिसली पाहिजे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे आणि हे चित्र बदलावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.